टीव्हीचे कलाकार सांगताहेत त्यांच्या एप्रिल फूलच्या आठवणी

JPN NEWS
मुंबई । संतोष खामगांवर - 
एप्रिल फूल करण्याचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. मित्र आणि कुटुंबियांनी एप्रिल फूल करून मुर्ख बनवलं नसेल, असा माणूस विरळाच. याच विचाराने आम्ही टीव्हीच्या कलाकारांना गाठलं आणि एप्रिल फूलच्या गमतीजमतींविषयी त्यांच्या मजेशीर आठवणी जाणून घेतल्या.

शुभांगी अत्रे ऊर्फ भाभीजी घर पर हैची अंगुरी भाभी - 
एप्रिल फूलच्या दिवशी अनेकदा मी फूल बनले आहे. कारण मी अगदी सहजच त्याला बळी पडते. सगळ्यात गमतीशीर प्रसंग म्हणजे माझ्या बहिणीने एकदा मला दही भल्ले दिले होते. पण, ते कॉटन बॉल्सचे होते. मला दही भल्ले फार आवडतात. मी काहीच विचार न करता ते चावायला गेले. त्यांना इतकं सुंदर रंगवलं होतं की ते अगदी खरे वाटत होते. मी ते खाणार इतक्यात ती जोरात हसू लागली आणि आपण मूर्ख बनलो हे माझ्या लक्षात आलं.

फरनाझ शेट्टी ऊर्फ सिद्धीविनायकची रिद्धी -
कॉलेजला असताना आम्ही मित्रमंडळींनी गोव्याची पिकनिक ठरवली होती. मी फारच उत्साहात होते. तिथे काय करायचं, खूप धमाल करायची वगैरे सगळं मी ठरवलं होतं. पण, ठरलेल्या दिवशी कोणीच आलं नाही. मी सतत त्यांना फोन करत होते पण कोणी फोनही उचलत नव्हतं. साधारण तासाभरानंतर त्यांचा फोन आला आणि सगळे पलिकडून हसत होते. मला इतकं खजील झाल्यासारखं वाटलं. पुढे आठवडाभर मी त्यांच्याशी बोलत नव्हते.

अग्निफेराचा अनुराग म्हणजेच अंकित गेरा -
ओह! एप्रिल फूल म्हटलं की मला एक प्रसंग आठवतो. माझ्या मित्रांनी गमतीत मला घाबरवलं होतं. माझ्या लहानपणीच्या मित्राने मला एक खूप सुंदर पॅक केलेलं गिफ्ट दिलं. ते इतकं सुंदर दिसत होतं की कधी उघडेन असं मला झालं. पण, त्यातून माझ्या हातावर उंदिर निघाला आणि मला आयुष्यभर पुरेल असा धक्का बसला. मी महिनाभर त्याच्याशी बोललो नाही. आजही गिफ्ट पाहिलं की मला तो उंदिरच आठवतो.

रोहिताश गौड ऊर्फ भाभीजी घर पर हैचा तिवारीजी - 
लहान असताना मी अशा गमतीजमती बऱ्याच केल्यात. एक प्रसंग मला आठवतो. मी माझ्या गणिताच्या टिचरला सांगितलं की त्यांच्या पतीला बरे वाटत नाहीए. त्या लगेच वर्ग सोडून गेल्या आणि आम्ही तो मोकळा वेळ धमाल करण्यात घालवला. मी वर्गाचा हिरो झालो होतो. मला गणित आवडायचं नाही. म्हणून मी त्यांना असं सांगितलं होतं. पण, आपण चुकीचं वागलो असं मला नंतर वाटलं. दुसऱ्या दिवशी त्या मला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेल्या आणि मला असेंबलीमध्ये शिक्षा करण्यात आली.