अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर


मुंबई - विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव मांडला आणि तो आवाजी मतदानाने मंजूर केला. 

विधानसभेत अर्थ विभागाची कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातची दोन विधेयके राज्य सरकारकडून मांडण्यात आली. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा ही करण्यात आली. मात्र त्यानंतर अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सभागृहाचा विश्वास असल्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सदर प्रस्ताव मांडण्यात आल्याचे जाहीर केले. त्यास लगोलग शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावालाअनुमोदन देत जाहीर केले. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी सदर प्रस्तावावर आवाजी मतदान घेतले. त्यास भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार सहमती दर्शवित दोन मिनिटात अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.

विरोधकांना त्यांनीच मांडलेला प्रस्ताव चर्चेला येत असल्याचा भ्रम झाला. मात्र त्यावर कोणतीही चर्चा न पुकारता सदर प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाकडून आवाजी मतदान घेत विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेत असल्याचे लक्षात येताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य उठून उभे राहून त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करे पर्यंत तालिका अध्यक्षांनी विश्वास दर्शक ठराव मंजूर करून सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूबही केले.
Previous Post Next Post