कचऱ्यात पाचव्यांदा "डेब्रिज" मिसळल्याचे आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई

JPN NEWS

मुंबई | प्रतिनिधी - मुंबई शहरातील कचरा कंत्राटदारांकडून खाजगी गाड्या भाडेतत्वावर घेऊन शहराबाहेर किंवा डम्पिंगवर टाकला जातो. त्या कामासाठी कंत्राट दिले जाते. कंत्राटामधील अटी व शर्तींचे उल्लंघन करून कचरा वाहून नेणा-या वाहनामध्ये 'डेब्रीज' मिसळल्याचे आढळल्यास संबंधीत कंत्राटदाराला दंड आकारण्यात येतो. त्यानुसार वाहनात पाचव्यांदा डेब्रीज आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारास 'काळ्या यादीत' टाकण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाने दिली.

कंत्राटदारांनी कचरा वाहतूक करताना पहिल्या वेळी कच-यासोबत 'डेब्रीज' वाहून नेताना आढळल्यास १० हजार, दुस-या वेळी रुपये २० हजार, तीस-या वेळी ३० हजार, चौथ्या वेळी ४० हजार रुपये असा दंड आकारण्यात येतो. मात्र पाचव्यांदा डेब्रीज आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारास 'काळ्या यादीत' करण्याची कार्यवाही पालिकेकडून केली जाते. कंत्राटदारांनी गाड्यांच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करावा यासाठी गाड्यांच्या क्षमतेच्या ९० टक्के एवढा कचरा उचलल्यानंतरच पूर्ण रकमेचे देयक कंत्राटदारास दिले जाते. तसेच वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा वाहून नेल्यास त्यासाठी अतिरिक्त रक्क्म कंत्राटदाराला मिळणार नाही, अशीही तरतूद कंत्राटामध्ये आहे. निविदेतील तरतूदीनुसार कंत्राटदारास फेरीनुसार अधिदान करण्यात येते. परंतु, जर आठवड्याचे प्रति फेरी सरासरी वजन ५.४ टनांपेक्षा कमी आढळल्यास त्याप्रमाणात अधिदानात कपात करण्यात येते. तसेच ६ टनापेक्षा अधिक कचरा असल्यास त्यासाठी अतिरिक्त अधिदान केले जात नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. २०१८ ते २०२५ या सात वर्षांच्या कालावधीकरीता कचरा वाहन कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीकडे ४ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यामध्ये मे. वेस्टलाईन (जेव्ही / जॉइंट व्हेंचर), मे. एसटीसी इटीसी एमएई (जेव्ही), मे. ए. वाय. खान (जेव्ही) आणि मे. क्लीन हार्बर (जेव्ही) या कंत्राटदारांशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे. यातील मे. वेस्टलाईन (जेव्ही / जॉइंट व्हेंचर) व मे. एसटीसी इटीसी एमएई (जेव्ही) या कंत्राटदारांच्या कामात कुठलीही अनियमितता आढळलेली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान सद्याच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदाराकडून कोणतीही अनियमितता नाही. तसेच २०१२ च्या कंत्राट रकमेच्या तुलनेत निविदा खर्चात २३ टक्क्यांची बचत झाली आहे. शिवाय महागाई निर्देशांकातील वाढ लक्षात घेता, ही बचत त्याही पेक्षा जास्त आहे, असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या कंत्राटदारांवर कारवाई - 
मे. ए. वाय. खान (जेव्ही) या कंत्राटदाराच्या वाहनात एकदा डेब्रीज आढळून आल्याने त्यांना १० हजार एवढा दंड ठोठावण्यात आला होता. मे. आर. एस. जे. (जेव्ही) आणि मे. डी. कॉन. डू ईट (जेव्ही) यांच्या वाहनामध्ये ५ पेक्षा अधिक वेळा डेब्रीज मिसळल्याचे आढळून आले. तसेच यासाठी त्यांना अतिरिक्त अधिदान झाल्याचे देखील आढळून आले. यामुळे त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या निविदा प्रक्रियेतून त्यांना बाद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या कंत्राटदारावर कारवाई नाही - 
मे. क्लीन हार्बर (जेव्ही) यांच्या वाहनात जरी ५ वेळा काही प्रमाणात डेब्रीज आढळून आले, तरी डेब्रीजचे वजन वजा करुनही कच-याचे सरासरी वजन ५.४ टनांपेक्षा जास्त होते. म्हणजेच कंत्राटदाराने वजन वाढविण्याच्या हेतुने डेब्रीज मिसळवले नव्हते, हे स्पष्ट होते. ज्यामुळे कंत्राटातील अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्याने त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आलेली नाही.
Tags