Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्य महिला आयोगाकडून महिलांसाठी 'सुहिता' हेल्पलाइन


मुंबई, दि. ८ : कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणाऱ्या आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'सुहिता' या नावाची समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित केली. या कार्यक्रमात बोलताना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आयोगामध्ये लवकरच मानवी तस्करीविरोधात (ह्यूमन ट्रॅफिकिंग) विशेष कक्ष सुरू करण्याची घोषणा केली. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये संकटग्रस्त,अन्यायग्रस्त महिलांसाठी अतीव उपयोगी ठरू शकते, अशी समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित करण्याचा सोहळा गुरूवारी आयोगाच्या वांद्रे येथील मुख्यालयात पार पडला. हेल्पलाइनचे अनावरण अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. कार्यालयीन वेळेत असणाऱ्या या हेल्पलाइनचा ७४७७७२२४२४ हा क्रमांक आहे. हेल्पलाइन सुरू झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५५० कॉल आले आहेत. पहिला कॉल हा यवतमाळ जिल्ह्यातील महिलेने केला होता.

मानवी तस्करीविरोधात विशेष कक्ष -
महिलांसाठी विविध प्रकारच्या हेल्पलाइन आहेत, पण संकटकाळात, नैराश्याच्या गर्तेत असताना त्यांना धीर देणारे, त्यांचे समुपदेशन करणारी हेल्पलाइन देशात इतरत्र नसावी, असे सांगून विजया रहाटकर यांनी या हेल्पलाइनमुळे महिलांना उत्तम प्रकारची मदत आणि मार्गदर्शन मिळण्याची खात्री व्यक्त केली. यावेळी त्यांनी आयोगाच्या भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये मानवी तस्करीविरोधातील तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आयोगामध्ये विशेष कक्ष स्थापन करणे आणि तस्करीच्या पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी 'आम्ही उद्योगिनी' आणि संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था (यूएनडीपी) यांच्या मदतीने कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. 

याच निमित्ताने 'साद दे, साथ घे' आणि 'प्रवास सक्षमतेकडे' या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचवेळी आयोगाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचेही उद‌्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर आम्ही उद्योगिनीच्या मीनल मोहाडीकर, संयुक्त राष्ट्रसंघ विकास संस्थेच्या (यूएनडीपी) आफरीन सिद्दिकी, अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष, आयोगाच्या सदस्या विंदा कीर्तिकर, अॅड. आशा लांडगे आणि सदस्य सचिव डॉ. मंजुषा मोळावणे उपस्थित होत्या.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom