Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'भारत बंद' दरम्यान ९ जणांचा मृत्यू - 'ॲट्रॉसिटी' कायद्यासंदर्भात फेरविचार याचिका दाखल


नवी दिल्ली - 'ॲट्रॉसिटी' कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला सोमवारी हिंसक वळण लागले. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रासह उत्तर भारतातील जवळपास १० राज्यांत हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, यात उत्तर प्रदेशमध्ये २, राजस्थानात १, तर मध्य प्रदेशात तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनामुळे या राज्यांतील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हजारो आंदोलकांची धरपकड केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने प्रस्तुत निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच 'ॲट्रॉसिटी' कायद्यातील काही कठोर अटी शिथिल करण्याचा निर्णय दिला होता. दलित संघटनांनी या निर्णयाद्वारे न्यायालयाने प्रस्तुत कायदा पूर्णत: पांगळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी सोमवारी पुकारलेल्या 'भारत बंद'ला उत्तर भारतातील जवळपास सर्वच राज्यांत हिंसक वळण लागले. विशेषत: पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड व गुजरातमध्ये आंदोलकांनी अनेक वाहनांची मोडतोड व जाळपोळ केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक ६ तर राजस्थानात १ व उत्तर प्रदेशात २ जण ठार झाले आहे. मध्य प्रदेशात एका विद्यार्थी नेत्याचा आंदोलनात मृत्यू झाल्यानंतर मोरेना, ग्वाल्हेर व भिंड या ३ जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या ठिकाणी शेकडो आंदोलक पोलिसांसोबतच्या चकमकीत जखमी झाले आहेत. भिंडमध्ये निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले असून, पंजाबमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यात आंदोलकांनी २ बसेस पेटवून दिल्या असून, त्यात अनेक प्रवासी जखमी झालेत. आग्रा, संभल, हापूर, मेरठ आदी जिल्ह्यांतही स्थिती चिंताजनक बनली आहे. परिणामी, केंद्राने सर्वच राज्यांना नागरिक व सार्वजनिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी योग्य ते उपाय करण्याचे निर्देश देत पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थानात शीघ्र कृती दलाचे तब्बल १७०० जवान पाठवले आहेत.

१०० रेल्वेंना फटका - 
या आंदोलनाचा जवळपास १०० रेल्वेगाड्यांना फटका बसला. या गाड्या रद्द करण्यात आल्यात किंवा उशिराने धावत आहेत. यूपीच्या हापूड रेल्वेस्थानकात जवळपास २००० कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळांवर जोरदार निदर्शने केली. हरयाणाच्या अंबाला व रोहतक या जिल्ह्यांसह राजधानी चंदिगडमध्येही हिंसक निदर्शने झाली. राजधानी दिल्लीतही आंदोलकांनी रेल्वे सेवा बाधित करण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत निषेध मोर्चे - 
देशातील दलित-आदिवासी समाजावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध करणाऱ्या ॲट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी मुंबईत दलित समाजातील सर्व संघटना व डाव्या पक्षांनी दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान निषेध मोर्चा काढला. या मोर्चात जाती अंत संघर्ष, भीम आर्मी, भाकप, माकप, लाल बावटा युनियन यांसह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी मोर्चेकऱ्यांकडून न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका केंद्र सरकारने दाखल करावी, या मागणीसंदर्भात घोषणा दिल्या जात होत्या. चैत्यभूमी येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. दुपारी वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता..

नागपूरमध्ये बस पेटवली - 
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला महाराष्ट्रातही प्रतिसाद मिळाला. मुंबई-ठाण्यात बंद शांततेत झाला असला तरी विदर्भसह राज्यातील इतर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. नागपुरात आंदोलकांनी दगडफेक करत बस पेटवली. अनेक ठिकाणी मोर्चे काढून सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. रास्तारोका, निषेध सभा, यासह काही ठिकणी दगडफेकीच्या देखील घटना घडल्या.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom