10 वर्षात इमारत कोसळल्यास विकासक, आर्किटेक्ट जबाबदार

JPN NEWS
नवीन इमारत बांधताना विमा काढणे बंधनकारक -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारती काही वर्षातच कोसळून पडल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत असते. हे प्रकार थांबववण्यासाठी इमारतीचे बांधकाम केल्यानंतर 10 वर्षात इमारत कोसळल्यास त्याला विकासक, आर्किटेक्ट व त्या संबंधिताना जबाबदार धरले जाणार आहे. तसेच नवीन बांधकाम करताना विकासकाने इमारतीचा विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. विमा नसल्यास संबंधितांना पालिकेकडून ओसी दिली जाणार नाही. या नवीन फेरबदलामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱयांवर आळा बसणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

मुंबईत जागोजागी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काही इमारती बांधकाम झाल्यानंतर 10 वर्षातच धोकादायक होतात. काही इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी अनेक इमारतीच्या बांधकामात त्रुटी, दोष आढळून आले आहेत. काही इमारतीची दुरुस्तीचे काम 10 वर्षाच्या आत करावे लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे 10 वर्षाच्या आत इमारतीच्या बांधकामात संरचनात्मक दोष आढळल्यास त्याला जबाबदार संबंधित विकासक कंपनी, आर्किटेक्चर, कंत्राटदार, उपकंत्राट दार आदी सबंधित असणार आहेत. तसेच इमारत दुर्घटना झाल्यास विमा संरक्षण मिळावे यासाठी इमारत विमा संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. विमापत्र नसेल तर पालिका ओसी देणार नसल्याचा नियम करण्यात आला आहे. हा नियम नवीन सर्व बांधकामाना लागू करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान या नियमामुळे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करून जबाबदारी झटकणारयाना चाप बसणार आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारती मुंबईत उभ्या राहणार नाहीत, त्यावर नियंत्रण राहील असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
Tags