Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त - मुख्यमंत्री


मुंबई - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेऊन राज्यात 60 लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून आज महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत घोषित केले. या पत्रकार परिषदेस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात सन 2012 च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ 45 टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 55 टक्के कुटुंबांसाठी शौचालय बांधण्याचे आव्हानात्मक काम होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नव नवीन कल्पना राबवून मिशन मोडवर काम करुन आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना 50 टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित करुन 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून 2018 मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात एकुण 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी 4 हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे. पहिल्या टप्प्यात शौचालय बांधून प्रत्येकाला शौचालयाचा एक्सेस मिळवून देण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा याबाबत जागृती करावी लागेल. शौचालय नसल्यामुळे स्त्रियांची होणारी कुचंबना आता थांबेल. त्याचबरोबर आरोग्यदायी वातावरण राहील.

मागील चार वर्षात बांधण्यात आलेल्या शौचालयाची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सन 2013-17 मध्ये 2 लाख 21 हजार 849, सन 2014-15 मध्ये 4 लाख 88 हजार 402, सन 2015-16 मध्ये 8 लाख 82 हजार 053, सन 2016-17मध्ये 19 लाख 16 हजार 461 तर सन 2017-18 मध्ये 22 लाख 51 हजार 081 तर सार्वजनिक व सामुहिक शौचालय 2 लाख 81 हजार 292 अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले 351 तालुके, 27 हजार 667 ग्रामपंचायती, 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त होऊन महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी घोषित केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून केलेल्या कामाचा आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom