काँग्रेसमुक्त देशाची भाषा नको - मोहन भागवत

JPN NEWS

पुणे - राष्ट्रनिर्मिती करताना केवळ आगामी शे-दोनशे वर्षांचा विचार न करता नजरेच्या पलीकडचे भविष्य गृहित धरून आपण वाटचाल केली पाहिजे, तरच आपले ध्येय साध्य होईल. आणि सकारात्मकता असेल, तर सार्थकता दिसते, हे आयुष्याचे सूत्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत 'अमूक मुक्त भारत', 'तमूक मुक्त भारत' अशा घोषणा राजकारणात सर्व ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील सगळ्यांनाच बरोबर घेऊन पुढे जायचे आहे, त्यामुळे '...मुक्त भारत ऐवजी, ...युक्त भारत' हा आमचा नारा आहे, काँग्रेस मुक्त देशाची भाषा नको, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे प्रसिद्ध लेखक आणि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या, तसेच अनुवादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक, विचारवंत आणि स्ट्रेटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदीप वासलेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. भागवत म्हणाले की, श्रद्धा या एका शब्दात हिंदुत्व या संकल्पनेचा सारांश असून आपले गाव, भाषा, प्रांत, कुटुंब अशा कोणत्याही गोष्टीवर असलेल्या आपल्या सकारात्मक श्रद्धेतून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय गाठणे शक्य होते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे; पण सकारात्मकतेच्या धाग्याने ही मतभिन्नता नाहीशी करता येणे शक्य आहे. प्रशासनालारे आपल्याला केवळ राज्य चालवायचे नसून, सर्वसामान्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्माण करायचा आहे.

उत्तम प्रशासकांची फळी - 
साहित्याची भाषा मांडणारे संवेदनशील प्रशासक हे भारताच्या राष्ट्रनिर्मितीमधील महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच सर्वसामान्यांची भाषा जाणणाऱ्या त्या भाषेद्वारे व्यक्त होणाऱ्या प्रशासकांची फळी निर्माण करण्याची गरज आहे, असे आवाहन भागवत यांनी केले.
Tags