AD BANNER

प्लास्टिकला पर्याय म्हणून एका महिन्यात भक्कम व्यवस्था उभारणार


मुंबई - राज्यात प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. मुंबई महापालिकेनेही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महापालिकेकडून प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुढील एका महिन्यात भक्कम व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जनजागृती करणे, कापडी-कागदी पिशव्या बनवण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे, प्लास्टिकचे संकलन आणि विल्हेवाटीची व्यवस्था निर्माण करणे अशा कामांचा समावेश असणार असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय़ घाईघाईने घेतला असे सांगत काही संस्था, संघटनांनी प्लास्टिकबंदीला विरोध केला आहे. काही संघटना न्यायालयातही गेल्या आहेत. त्यामुळे ‘प्लास्टिकमुक्त मुंबई’ या निर्णय़ावर पालिका नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध भागात २५ ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. काही मार्केटही प्लास्टिकमुक्त करण्यात आली आहे. इतर उपाय योजनाही पालिकेने केल्या आहेत. मात्र संकलित झालेल्या प्लास्टिकचे करायचे काय, असा हा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला होता. त्यानुसार खासगी कंपन्यांच्या माध्यमातून संकलित प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा विचार सुरू आहे. काही खासगी कंपन्यांनी याआधीच पालिकेकडे विचारणा केली असून त्यामुळे संकलित केलेल्या प्लास्टिकच्या विल्हेवाट आणि योग्य पुनर्वापराची प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. खाजगी कंपन्यांवर पालिकेचे लक्ष राहणार असून कामाचा अहवालही सातत्याने मागवला जाणार आहे. तसेच संकलित केलेले प्लास्टिक पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकू दिले जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या एका अधिका-याने दिली.

Post a Comment

Previous Post Next Post