
मुंबई - मध्य रेल्वेला सिनेमा, जाहिराती आणि मालिकांच्या शूटिंगमधून १ कोटीहून अधिक रुपयांची कमाई झाली आहे. गेल्या काही वर्षात शुटिंगमधून मिळालेली हि सर्वाधिक रक्कम असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
रेल्वेकडून प्रवाशांची जास्त गर्दी नसते अशा मुंबईबाहेरील वाथर, आप्टा रेल्वे स्थानकांवर आणि वाडी बंदर रेल्वे यार्ड मध्ये शुटींगसाठी परवानगी दिली जाते. जर कोणाला गर्दी असलेल्या स्थानकात शूटिंग करायची असल्यास मध्य रात्री नंतर परवानगी देण्यात येते. त्याबदल्यात निर्मात्यांकडून शुल्क आकारले जाते. निर्मात्यांना याआधी परवानग्या मिळवण्यासाठी रेल्वेच्या विविध विभागांची परवानगी घ्यावी लागत होती. त्यात बदल करून रेल्वेने एक खिडकी योजना लागू केली होती. याला निर्मात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मागील वर्षी १५ रेल्वे स्थानकावर शुटिंगची परवानगी देण्यात आली त्यात विशेषकरून संजय दत्त याचा भूमी, मराठी चित्रपट शिवाजी पार्क, बंगाली चित्रपट कबीर, बादशाह, गली बॉय, पेप्सीची जाहिरात याचा समावेश आहे. या चित्रपट आणि जाहिरातींच्या शुटींगच्या माध्यमातून सन २०१७ - १८ मध्ये रेल्वेला १ करोड ८७ हजार ९६० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. सन २०१६- १७ मध्ये रेल्वेला ७४ लाख तर सन २०१५ - १६ मध्ये ८१ लाख २१ हजार ७९४ रुपये मिळाले होते. रेल्वेला मिळालेल्या सर्वाधिक उत्पन्नात गली बॉय या चित्रपटाच्या शुटींगमधून १५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.