उंदरांना उपाशी ठेवण्याचा पालिका आयुक्तांचा अजब सल्ला - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

10 April 2018

उंदरांना उपाशी ठेवण्याचा पालिका आयुक्तांचा अजब सल्ला


महापालिकेने वर्षभरात 2 लाख उंदीर मारले - 
मुंबई - मुंबईत अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने उंदरांचे आणि घुशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या उंदीर आणि घुशींना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. यावर मुंबई महापालिका आयुक्तांनी उंदरांची उपासमार करण्याचा अजब सल्ला दिला आहे. महानगरपालिकेने 2016 मध्ये वर्षभरात 2 लाख 10 हजार 737 उंदीर मारले आहेत. या कालावधीत महापालिकेकडे उंदीर आणि घुशींबाबत 10 हजार 551 तक्रारी आल्या असल्याची माहिती आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात दिली आहे.

मुंबईत जुन्या मोडकळीस आलेल्या 19 हजार 600 इमारती व चाळी आहेत. त्यापैकी 14 हजार इमारतींचा पुनर्विकास वेगवेगळ्या कारणांनी रखडला आहे. जुन्या इमारती व चाळींच्या भिंतीलगत उंदीर आणि घुशींनी मोठ्या प्रमाणात बिळे पाडली आहेत. या इमारती व चाळींना धोका निर्माण झाला असल्याने रहिवाश्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. त्यामुळे उंदीर आणि घुशींना आळा घालण्यासाठी महापालिकेने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेवर महापालिका आयुक्तांनी अभिप्राय दिला आहे.

या अभिप्रायात ज्या परिसरात अस्वच्छता असते तसेच अन्न पदार्थ खाण्यास उपलब्ध होतात त्या परिसरात उंदरांचे प्रमाण वाढते. उंदरांचे प्रमाण कमी करावे म्हणून खाद्य पदार्थ मिळणार नाही, उंदरांचा घरात प्रवेश होणार नाही तसेच त्यांना आसरा मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी असे म्हटले आहे. उंदीर आणि घुशी यांची संख्या कमी करण्यासाठी नागिरकांनी आणि चाळ कमिटीने परिसरात स्वच्छता राखावी, स्वयंपाक घरातील कचरा कुंडींतच टाकावा, उंदरांची उपासमार व्हावी म्हणून उघड्यावर कुठलेही खाद्यपदार्थ मिळणार नाही याची काळजी घ्यावी, घरांमध्ये आणि इमारतींमध्ये मुषक रोधक बसवावेत अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. 

उंदीर आणि घुशी हे सस्तन प्राण्यांमध्ये मोडतात. गर्भधारणेनंतर 21 ते 22 दिवसात मादी उंदीर 5 ते 14 पिल्लांना जन्म देते. उंदरांचे आयुर्मान साधारणपणे 18 महिन्यांचे असते. एका उंदराच्या जोडी मुळे 15 हजार नवीन उंदीर तयार होतात. पालिकेकडून मुषक नियंत्रणासाठी 23 कनिष्ठ अवेक्षक, 137 मुषक नियंत्रण कामगार, 31 रात्रपाळी मुषक संहारक कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारे मुषक सापळा लावणे, विषारी गोळ्या टाकणे, बिळांमध्ये गोळ्या टाकून वाफारणी करणे, रात्रीच्यावेळी काठीने उंदीर मारणे या चार पद्धतीने उंदीर आणि घुशींना आळा घातला जात आहे. 

नागरिकांवर जबाबदारी ढकलू नये -
शहरातील कचरा वर्गीकरण करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. तरीही कचरा वर्गीकरण नागरिकांनीच करावे असे परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे. पालिका आयुक्त सर्वच जबाबदाऱ्या नागरिकांवर ढकलत आहेत. सर्वच जाबदाऱ्या नागरिकांवर ढकलल्या तर पालिका काय करणार ? आयुक्तांच्या या पद्धतीचा निषेध. नागरिक परिसराची स्वच्छता राखू शकतात. चाळ कमिटी आणि नागरिकांकडे उंदीर मारण्याची तसेच बिळे बुजवण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे उंदरांचे प्रमाण वाढून इमारतींना धोका निर्माण झाला आहे. 
- दत्ता नरवणकर, नगरसेवक

Post Top Ad

test