दलित-अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर रिपब्लिकन नेते राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई | प्रतिनिधी -  देशभरात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव वाढतो आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. पोलीसांसमक्ष दलित आणि अल्पसंख्यांक तरुणांना रक्तबंबाळ केले जात आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य बिघडविले जात आहे. त्यामुळे देशभरातील दलित-अल्पसंख्यांक समाज दहशतीच्या वातावरणात जगत आहे. तसेच दलितांच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेल्या अट्रोसिटी कायद्याची धार जाणीवपूर्वक बोथट केली जात आहे. समाजाच्या अशा अनेक व्यथा घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) चे राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर हे प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशभरातील दलित आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत चर्चा केली जाणार आहे. 

केंद्रात आणि देशातील काही बहुसंख्य राज्यांत भाजपचे सरकार सत्तेवर आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून हे समाज भयभीत झाले आहेत. पक्ष्याच्या नावावर काही हिंदुत्ववादी युवक त्यांना टार्गेट करून देशाला रक्तरंजित करू पाहत आहेत. यासाठी धर्मांध तरुणांना पोलीस आणि सरकारकडून पाठबळ मिळत आहे. अनेक ठिकाणी तर पोलिसांसमोर अल्पसंख्याक आणि दलितांना मारहाण केली जात आहे. पोलिसांकडूनच त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्याच्या व्हिडीओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे देशभरातील दलित-अल्पसंख्यांक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. देशाची परिस्थिती अधिक भयावह होण्याआधीच देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती या नात्याने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, तसेच भयभीत झालेल्या दलित समाजाला भयमुक्त करावे, दलितांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला ऍट्रोसिटी कायदा अधिक कठोर करावा तसेच खोट्या गुन्ह्यात कारागृहात बंदिस्त असलेले भीम आर्मीचे नेते वकील चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) चे शिष्टमंडळ राष्ट्रपती कोविंद यांना भेटणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यात आले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व नावकर करणार आहेत. 
Previous Post Next Post