
मुंबई : मुंबईमध्ये शाहीरी भवन उभे करण्याची अनेक वर्षे मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी जरी आपण सत्तेत नसलो तरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी येथे 'शाहिरी लोकरंग' कार्यक्रमात बोलताना दिले. तर खासदार शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत यांनी ही मागणी पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला. शाहिरी लोककला मंचच्या वतीने परळच्या दामोदर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शाहिरी लोककला पुन्हा लोकमानसात रुजविण्यासाठी शाहिरी लोककला मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय कार्यक्रमाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. या दुसऱ्या 'शाहिरी लोकरंगा'चे उद्घाटन कामगार नेते सचिन अहिर यांनी केले. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून खा. अरविंद सावंत, ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, तर विषेश पाहुणे म्हणून नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर-पांडये, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेवक दत्ता पोंगडे, गायक संदेश विठ्ठल उमप, संगीतकार बाळ नाईक, नंदू खोत, अभिनेते नारायण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. .
प्रारंभी मंचचे सरचिटणीस आणि प्रसिद्ध शाहीर मधु खामकर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष महादेव खैरमोडे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. अजूनही आपल्या आवाजात गोडवा टिकवणाऱ्या ज्येष्ठ शाहिरांचा आणि तितक्याच तडफतेने त्यांना साथ करणाऱ्या युवा शाहिरांच्या कलागुणांचा गुणगौरव करून खा. अरविंद सावंत म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राने देशापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. शाहिरी लोककलेमुळेच महाराष्ट्राची शान कायम टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा, स्वातंत्र्याचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास शाहिरांनी आपल्या लेखानीद्वारे लोकांपुढे आणून इतिहास रचला, असेही खा. अरविंद सावंत आपल्या भाषणात म्हणाले.
मुुंबईत शाहिरांनी आपल्या कर्तृत्वातून रचलेलेल्या इतिहासाला उजाळा देऊन, यशवंत जाधव म्हणाले, पारंपरिक शाहिरी लोककला पुढे नेण्याच्या शाहिरी मंचने आरंभलेल्या कामाला आम्ही नेहमीच सहकार्य देऊ. शाहिरी मंचच्या या निष्ठामयी कार्याला दीड लाख रुपयाचे अर्थसहाय्य घोषित करून ११ हजारांची देणगीही कलावंत मंचला दिली.