सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2018

सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत !


मुंबई / संतोष खामगांवकर -
भारतातील गुणी होतकरू अभिनेत्यांच्या उत्कृष्ट अभिनयकौशल्यामुळे गाजलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या अभिनय गुणशोध रिअॅलिटी कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती लवकरच प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्त्यांनी मनोरंजन क्षेत्राला निहार गीते, कार्तिकेय राज, तमन्ना दीपक, कार्तिकेय मालवीय, स्वस्ती नित्या, प्रणीत शर्मा यांच्यासारखे काही गुणी कलाकार दिले असून त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता आपल्या तिसर्‍्या आवृत्तीद्वारे प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाबरोबरच भावी सुपरस्टार होण्यासाठी गुणी होतकरू कलाकारांच्या अभिनयकौशल्याचे संवर्धन करण्याचा ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ कार्यक्रमाचा हेतू असेल.

नामवंत हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षकाच्या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा या कार्यक्रमात परतत असून ती यातील स्पर्धकांना अभिनयातील काही खाचाखोचा समजावून सांगेल. या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहण्याच्या शक्यतेमुळे उत्साहित झालेल्या सोनालीने सांगितले, “‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमाशी पहिल्यापासून मी निगडित झाले असून त्याच्या नव्या आवृत्तीची घोषणा झाल्यावर मला पुन्हा एकदा स्वगृही आल्यासारखं वाटतं. देशातील लहान मुलांमध्ये दडलेल्या अभिनयगुणांचा शोध घेऊन त्यांना प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं महत्त्वाचं काम हा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमातील सहभागामुळे या मुलांना जगाला सामोरं जाण्याचा सराव होत असल्याने त्यांच्या भावी कारकीर्दीची पार्श्वभूमी तो तयार करतो.”

सोनाली म्हणाली, “मी आई झाले, त्याच्या आधीपासूनच मला लहान मुलं फार आवडायची. सध्याच्या इच्छुक मुलांमध्ये फारच उत्तम अभिनयगुण असून ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमात त्यांच्या या गुणांना पूर्म वाव मिळताना पाहून मला खूप आनंद होतो. त्यांचा उत्साह काही औरच असतो आणि आपल्या कामाबद्दल त्यांची समर्पित वृत्ती आणि प्रामाणिकपणा पाहून मलाही प्रेरणा मिळते!” या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांच्या ऑडिशन्स सध्या देशाच्या विविध शहरांमधून सुरू आहेत.

Post Bottom Ad