स्वच्छ भारत अभियानात चांगल्या रँकिंगसाठी ‘स्वच्छ मुंबई अभियान’

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - केंद्र सरकारने देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत शहरांना रँकिंग दिले जाते. या स्पर्धेत श्रीमंत असलेली मुंबई महापालिका सातत्याने मागे पडत आली आहे. श्रीमंत असलेली सर्वात मोठी महापालिका स्वच्छ भारत अभियानामध्ये मागे पडल्याने आता महापालिकेने ‘स्वच्छ मुंबई अभियान’ राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लवकरच २४ वॉर्डांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात येणार आहे. वॉर्डातील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये यांच्यातील स्वच्छतेचे मूल्यांकन करून वॉर्डांना रॅकिंग दिले जाणार आहेत.

स्वच्छ भारत अभियानात मुंबईला चांगले रॅकिंग मिळावे म्हणून आणि मुंबई स्वच्छ व सुंदर दिसावी यासाठी २४ वॉर्डांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा राबवली जाणार आहे. स्वच्छतेच्या निकषांवर दिलेल्या गुणांवरून वॉर्डांना १ ते २४ असे क्रमांक दिले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला चांगले रँकिंग मिळावे म्हणून वॉर्डांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वॉर्डातील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला, व्यापारी संघटना यांच्यातील स्वच्छतेच्या आधारे वॉर्डांना गुण दिले जाणार आहेत. याकरीता राज्य सरकारकडून मानक कार्यप्रणाली पालिकेने मिळवली आहे. या कार्यप्रणालीनुसार प्रश्नावली तयार करणे, स्पर्धेसाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तयार करणे, स्पर्धेचे आयोजन करून निकाल लावण्यासाठी खाजगी संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. वॉर्डातील सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा दर्जा, जलजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यंची नोंद अशा बाबींचाही निकषांमध्ये समावेश करावा केला जाणार आहे.
Tags