पालिका रुग्णालयातील रुग्णांना रोगप्रतिकारक फळे द्या

JPN NEWS
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातून गरीब व गरजू रुग्ण उपचार घेत असतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्याना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आहार मिळत नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळ संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी आणि पपई सारखी पौष्टिक फळे द्यावीत अशी मागणी भाजपाचे नगरसेवक सुषम सावंत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

मुंबईकर नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेच्या तीन प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालये, दंत रुग्णालय, दवाखाने, आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह या माध्यमातून संपूर्ण आरोग्य सेवा पुरवली जाते. राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालय आणि प्रसुतीगृहांमध्ये दाखल होणाऱ्या आंतररुग्णांना आरोग्यविषयक सेवेबरोबरच आहारही देण्यात येतो. महापालिका रुग्णालयांतील बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पौष्टिक फळे विकत घेणे त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळ आणि संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी तसेच पपई सारखी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी फळं देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक सुषम सावंत यांनी केली आहे. त्यासाठी सावंत यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मंडळी आहे. या ठरावाच्या सूचनेला येत्या महासभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर पालिका रुग्णालयातील रुग्णांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फळे मिळू शकतील.
Tags