Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शहरातील वनीकरणावर भर देण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन


मुंबई - राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. वनमंत्र्यांनी अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर यांना पाठवले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांनादेखील वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून राज्याच्या महावृक्ष लागवडीचे फलित दिसून येत असल्याचे सांगताना त्यांनी विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशात मिळवलेल्या प्रथम स्थानाची माहिती दिली आहे. पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्य हे वनेत्तर क्षेत्रामधील वृक्ष आच्छादनामध्ये (Tree Cover in Non Forest Area ) देशामध्ये अग्रगण्य राज्य ठरले आहे. राज्यामध्ये कांदळवन तसेच बांबू क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. राज्यामध्ये घनदाट जंगल म्हणजे ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी ची वाढ दर्शविली आहे.

भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ. कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ कि.मी ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१५ मध्ये राज्यात एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी इतकी आहे. राज्यात २०१५ मध्ये बांबू प्रवण क्षेत्र ११४६५ चौ.कि.मी होते. ते २०१७ मध्ये १५९२७ चौ.कि.मी इतके झाले म्हणजे २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी म्हणजे ४ लाख ४६ हजार २०० हेक्टने वाढ झाली आहे. राज्यात वृक्ष लागवडीला मिळत असलेला मोठा जनाधार या सर्व क्षेत्रातील यशामागचे कारण आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर आपल्याला मात करावयाची आहे. त्यासाठी आपलं शहर स्वच्छ-सुंदर आणि हरित असणे अगत्याचे आहे. शहराचे सौंदर्य वाढवून शहरे पर्यावरणस्नेही करायची असतील तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, वृक्ष जगवले जाणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असून शहरांच्या शाश्वत विकासासाठी पावले उचलताना त्याला वनीकरणाची जोड देण्याचे धोरण विभागाने निश्चित केले आहे. कुठले झाड कुठे लावायचे, रोपे कुठून मिळवायची, ती कशी लावायची या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन वन विभाग करत आहे. येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. शहरातील नागरिकांनीही पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, आपल्या भागात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे आणि लावलेले वृक्ष जगतील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom