मुंबईत २५ सार्वजनिक ठिकाणांसह मंडयांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्लास्टिक बंदी राबवित असताना घरातील प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी येत्या सोमवारपासून संकलन केंद्र सुरु करण्यात येत आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व मंडयांमध्ये देखील ही केंद्रे लवकरच सुरु करण्यात येणार असून गरजेनुसार यांची संख्या वाढविली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त (विशेष) निधि चौधरी यांनी दिली आहे. 

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक ठिकाणी ४ बाय ५ फूट आकाराचे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येत आहेत. महापालिकेच्या साठ्यातील आधीपासूनच असलेल्या कचरा संकलन पेट्यांचा वापर करुन ही प्लास्टिक संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रतिबंधित प्लास्टिकच्या संकलनासाठी उपयोगात येणा-या या संकलन केंद्रांना प्रामुख्याने काळा रंग देण्यात आला असून चाके असल्याने ही संकलन केंद्रे हलविणे सुलभ असणार आहे. पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या २५ सार्वजनिक ठिकाणी ही संकलन केंद्रे सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, माँसाहेब मीनाताई ठाकरे महापालिका मंडई (दादर फुल मार्केट), कुलाबा कॉजवे, मंगलदास मार्केट, महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), चेंबूर मंडई, फॅशन स्ट्रीट, चोर बाजार, हिंदमाता मंडई, जव्हेरी बाजार, साईनाथ मंडई मालाड, घाटकोपर मंडई, मुलुंड मंडई, लोखंडवाला मंडई इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. महापालिकेच्या सर्व मंडयांमध्ये देखील लवकरच प्लास्टिक संकलन केंद्रे सुरु करण्यात येणार असून गरजेनुसार केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने येत्या सोमवार पासून होणा-या या संकलन केंद्रांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जमा करुन नागरिकांनी प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यास हातभार लावावा, असे आवाहन निधि चौधरी यांनी केले आहे.
Tags