महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यशवंत जाधव यांच्या हाती

JPN NEWS

दिलीप लांडे यांना सुधार समितीची लॉटरी -
सातमकर, चेंबूरकर यांना चौथ्यांदा संधी - 
मुंबई । प्रतिनिधी - श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर सभागृह नेते यशवंत जाधव यांची नियुक्ती केली जाणार आहे. यशवंत जाधव यांनी आज सोमवारी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समितीचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असल्याचे बोलले जाते. जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदावर नियुक्ती होणार असल्याने तिजोरीच्या चाव्या आता जाधव यांच्या हाती असणार आहेत. 

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा प्रशासनावर वचक वाढत चालला होता. समित्यांमध्ये कोणताही प्रस्ताव मंजूर करताना भाजपाच्या विरोधाचा सामना शिवसेनेला करावा लागत होता. भाजपाचा विरोध मोडून काढण्यासाठी आणि भाजपाचा पालिका प्रशासनावरील वचक कमी करण्यासाठी आपल्या जेष्ठ नगरसेवकांची नियुक्ती वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदावर केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सभागृह नेते यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी, मंगेश सातमकर यांनी शिक्षण समिती अध्यक्ष्यपदासाठी, मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप लांडे यांनी सुधार समिती अध्यक्षपदासाठी तर आशिष चेंबूरकर यांनी बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समिती अध्यक्षपदावर सभागृह नेते यशवंत जाधव यांची नियुक्ती होणार असल्याने जाधव यांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. मनसे मधून आपल्या सहा सहकारी नगरसेवकांबरोबर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या दिलीप लांडे यांची सुधार समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली जाणार असल्याने लांडे यांना सुधार समितीची लॉटरी लागली आहे. तर मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांनी तीन वर्षे शिक्षण आणि बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता यावा म्हणून या सातमकर यांची शिक्षण समिती अध्यक्षपदावर तर आशिष चेंबूरकर यांची बेस्ट समिती अध्यक्षपदावर नियुक्ती केली जाणार आहे. सत्ताधारी शिवसेनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाच्या वतीने वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने या निवडणूका बिनविरोध होणार आहेत. 

यशवंत जाधव यांच्या अपेक्षा पूर्ण - 
फेब्रुवारी २०१७ मध्ये संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते व जेष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांना महापौरपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महापौर पदी विश्वनाथ महाडेश्वर यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली. यशवंत जाधव नाराज असल्याने त्यांना सभागृह नेते पद देण्यात आले. स्थायी समितीला पालिकेच्या तिजोरीची चावी बोलले जाते. या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात असाव्यात अशी अपेक्षा सर्वच नगरसेवकांची असते. जाधव यांनाही या चाव्या आपल्या ताब्यात असाव्यात अशी अपेक्षा असताना स्थायी समिती अध्यक्षपदावर रमेश कोरगांवर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जाधव यांना महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांचा अपेक्षा भंग झाला होता. मात्र एका वर्षातच जाधव यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. पक्षाने जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडेंना लॉटरी -
मनसेला जय महाराष्ट्र करत आपल्या सहा नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडे यांना सुधार समितीच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. मनसेमध्ये असताना दिलीप लांडे हे पक्षाचे गटनेते होते. मनसेमध्ये असतानाही लांडे यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करत कुर्ल्याच्या एल प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळविले होते. शिवसेनेत प्रवेश केल्यावर लांडे यांनी आपण एल प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरच खुश असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. सुधार समिती अध्यक्षपद मला नको असे सांगणाऱ्या लांडे यांना पक्षाने सुधार समितीच्या अध्यक्षपदावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेला महापालिकेतून संपवणाऱ्या दिलीप लांडे यांना सुधार समितीच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

सातमकर, चेंबूरकर यांना चौथ्यांदा संधी - 
शिवसेनेतील जेष्ठ नगसरसेवक असलेले मंगेश सातमकर यांची शिक्षण समिती अध्यक्षपदावर तर आशिष चेंबूरकर यांची बेस्ट समिती अध्यक्षपदावर नेमणूक केली जाणार आहे. मंगेश सातमकर यांनी शिक्षण समिती अध्यक्ष्यपद तिन वेळा भूषविले आहे. तर आशिष चेंबूरकर यांनीही बेस्ट समिती अध्यक्ष्यपद तिन वेळा भूषविले आहे. सातमकर आणि चेंबूरकर यांना पक्षाने चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली आहे. 

निवडणूक कधी - 
५ एप्रिलला दुपारी १२ वाजता शिक्षण समिती 
५ एप्रिलला दुपारी २ वाजता स्थायी समिती 
६ एप्रिलला दुपारी १२ वाजता सुधार समिती 
६ एप्रिलला दुपारी ३ वाजता बेस्ट समिती 
Tags