पालिका रुग्णालयातील सशुल्क खाटांचे दर सहापट वाढणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2018

पालिका रुग्णालयातील सशुल्क खाटांचे दर सहापट वाढणार


मुंबई - खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने मध्यमवर्गीय व गरीब रुग्ण पालिका रुग्णालयात उपचार घेतात. मात्र पालिका प्रशासनाने सशुल्क खाटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिगर वातानुकूलीत खाटांचा दर तब्बल सहापट वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या बिगरवातानुकूलित खाटांसाठी २०० रुपये प्रति दिन शुल्क असून यापुढे ते ९०० रुपये आकारण्यात येणार आहे, तर वातानुकूलित खाटांसाठी १२०० रुपये इतकी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाने यावर निवेदनही केले. यामुळे रुग्णांवर आर्थिक भर पडणार असल्याने या प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 

काही वर्षांपूर्वी पालिका रुग्णालयात सशुल्क खाटांची संकल्पना अमलात आणली गेली. सध्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ११ बिगरवातानुकूलित तर १९ वातानुकूलित खाटा आहेत. विलेपार्ले येथील डॉ. रू. न. कूपर रुग्णालयात ५१ खाटांना मंजुरी असून त्यातील पाच वातानुकूलित तर १० बिगर वातानुकूलित खाटा उपलब्ध आहेत. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात २५ खाटा सशुल्क आहेत. खासगी रुग्णालयातील न परवडणाऱ्या दरांमुळे व पालिका रुग्णालयातील गर्दी यामुळे या सशुल्क खाटांचा आधार मध्यमवर्गीयांकडून घेतला जातो. महापालिकेचा वाढता खर्च तसेच सध्या आकारण्यात येणारे दर हे खासगी रुग्णालयांपेक्षा खूप कमी असल्याने तसेच रुग्णालयातील अद्ययावत सुविधांमुळे पालिकेचा रुग्णशय्येमागे होणारा वाढता खर्च विचारात घेऊन खाटांच्या शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित केल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या यानुसार सध्या खाटांसाठी २०० रुपये प्रतिदिन शुल्क आहे. याला सभागृहात मंजुरी दिल्यास यापुढे रुग्णांना बिगरवातानुकूलित खाटांसाठी ९०० रुपये तर वातानुकूलित खाटांसाठी १२०० रुपये प्रति दिन मोजावे लागतील. मात्र भरमसाठ वाढवण्यात आलेल्या या शुल्काला सभागृहात तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad