बेस्टच्या विद्युत विभागात आता कंत्राटी कर्मचारी


मुंबई - बेस्टमध्ये खाजगी बसगाड्या घेण्याचे यशस्वी प्रयत्न केल्यानंतर बेस्ट प्रशासन आता विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आहे. विद्युत विभागासाठी प्रथमच निरनिराळी अकुशल कामे करण्यासाठी मजूरांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी बेस्ट ५०० मजुरांसाठी वर्षाला १८ कोटी ७० लाख ७५० रुपये खर्च करणार आहे. 

मुंबई शहर हद्दीमध्ये विविध ठिकाणी उत्खनन करणे, तारखंड टाकण्याची कामे करणे आणि अन्य सामन्धीत तांत्रिक कामे पार पाडणे यासाठी अकुशल कामगारांची बेस्टला गरज असते. यापूर्वी बेस्ट मध्ये नवघाणी या पदावरील कर्मचारी ही कामे करत असत. मात्र आता यापुढे या पदावरील कर्मचाऱ्यांची भरती न करता कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने हि पदे भरली जाणार आहेत. बेस्ट ने ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुपर सर्व्हिस पॉईंट व डी एम एंटरप्राइज या दोन कंत्राटदारांना हि कामे देणार असून त्यासाठी १८ कोटी १९ लाख ७० हजार ७५० रुपये खर्च करणार आहे. यासाठी सदर कंत्रादाराला प्रतिदिन प्रतिकामगार ८४५ रुपये खर्च येणार आहे.

सध्या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात या कामांसाठी नवघाणी कर्मचारी नियुक्त असून त्यांचे वेतन महिन्याला साधारण १९ हजार रुपये आहे व दिवसाला साधारण १ हजार १४७ रुपये खर्च प्रति कामगार बेस्टला येतो. तसेच हंगामी कामगारास सध्या बेस्ट उपक्रमाकडून दिवसाला ७०४ रुपये देण्यात येतात व बस पास दिला जातो असा ७७४ रुपये खर्च बेस्ट उपक्रमास येतो. त्याशिवाय सुरक्षेची साधने व अवजारे देखील या हंगामी कामगारांस पुरवावी लागतात. या १० टक्क्यांचा विचार करता बेस्टला ८५१ रुपये खर्च बेस्ट उपक्रमास येतो. म्हणून मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्यासाठी तसेच विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात हंगामी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शहरात मोठ्या संख्येने विद्युत दोष प्रलंबित असल्यानेच बेस्ट उपक्रमाने कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
बेस्टने हंगामी तत्वावर कामगारांची भरती केली गेली तरी ते कामगार नंतर नवघाणी म्हणून कायमस्वरूपी श्रेणी मध्ये बढती प्राप्त करण्यासाठी ते मान्यताप्राप्त कामगार संघटनांकडे धाव घेतात. म्हणूनच बेस्ट ने खाजगी कंत्राटदाराकडून मजूर घेण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे.

बेस्ट समितीत विरोध करणार - अनिल कोकीळ 
एकीकडे बेस्ट मध्ये विद्युत विभागात व परिवहन विभागात असंख्य पदे रिक्त असताना बेस्ट प्रशासन खाजगी कंत्राटदारांकडून कामगार भरती करत आहे. भाड्याने बसगाड्या घेण्याच्या प्रकरणात कर्मचारी संघटना न्यायालयात गेल्या होत्या त्याचप्रमाणे या बाबतीतही कामगार संघटना न्यायालयात जातील . कंत्राटदाराच्या कामगाराचा खर्च व स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा खर्च यात जास्त तफावत नाही, त्यापेक्षा बेस्टने अनुकंपा तत्त्वावरील पदांची संख्या ७०० च्या वर गेली आहे ती भरण्याचा प्रयत्न करावा. असे न करता अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास आम्ही जोरदार विरोध करणार असल्याचे बेस्ट समिती समिती सदस्य अनिल कोकीळ यांनी सांगितले.
Previous Post Next Post