Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री


मुंबई - गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबत विविध यंत्रणांनी केलेल्या तयारीचा समग्र आढावा घेतला. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, यावर्षी राज्यामध्ये पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही सर्वांसाठी दिलासा देणारी बाब असून या काळात आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या अडचणींवर मार्ग काढतानाच या वर्षीच्या नियोजनात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याने यावर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे पाणी साचेल अशी चर्चा आहे. त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यासाठी विशेष दक्षता घेऊन उपाययोजना केली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याबरोबरच विशेष करुन मुंबईमध्ये सर्वच यंत्रणांनी पावसाळ्यामध्ये अधिक समन्वय राखत आपत्ती उद्भवल्यास सक्षमपणे तोंड द्यावे. राज्य शासनाकडून यंत्रणांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस.घोसाळीकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले, मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून महाराष्ट्रात 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात जूनमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला.

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१८ला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर दुष्काळ व्यवस्थापन आराखडा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजना -
- शहरात पावसाचे पाणी साचण्याची २२५ ठिकाणे आढळून आली आहेत. त्यातील १२० ठिकाणांवर उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये पूर्व उपनगरातील ७४, पश्चिम उपनगरातील ८८ तर मुंबई शहरातील ६३ अशी २२५ ठिकाणे आहेत.
- शहरात पावसाचे पाणी उपसा करणारे २९८ पंप यावर्षी बसविण्यात आले असून शहरात १०२, पूर्व उपनगरात ९६आणि पश्चिम उपनगरात १०० अशी त्यांची संख्या आहे. तासाला १ हजार घनमीटर पाणी उपसा करणारी उच्च दाबाचे पंप प्रथमच बसविण्यात आले आहेत.
- मुंबईत २५० किलोमीटर लांबीचे नाले असून ९५ टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ मे पूर्वी केले जाईल.
- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगतच्या भूमिगत गटारांमध्ये यावर्षी कॅमेरे बसविण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पाण्याचा होण्याऱ्या निचऱ्याची सचित्र माहिती मिळणार आहे.
- त्याचबरोबर दहिसर, मिठी, पोईसर, ओशिवरा नदी, मोगरा नाला अशा सात ठिकाणी ट्रॅश बूम लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये प्लॅस्टिकचा कचरा जमा होणार नाही.
- मुंबईत सात ठिकाणी रडारलेव्हल ट्रान्समीटर बसविण्यात आले असून यामुळे मुंबईतील नदी आणि तलावांच्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.
- मुंबईतील १२०० मॅनहोल्सवर सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
- मुंबई महापालिकेचे १९४१ कि.मी लांबीचे रस्ते असून ३१ मेपूर्वी या रस्त्यावरील डागडुजीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
- मुंबईत सी-१ वर्गाच्या ६८८ धोकादायक इमारती असून त्याखाली करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत.
- पावसाळा व त्यासंबधी आजार आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालये आणि परिसरातील रुग्णालयातील १३०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- मुंबईतील गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या सहा बीचवर सुरक्षेसाठी ३६ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom