विकास आराखड्यात राज्य सरकारकडून मोठे फेरबदल - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 May 2018

विकास आराखड्यात राज्य सरकारकडून मोठे फेरबदल

दुसऱ्या भागाच्या मंजुरीला आणखी कालावधी लागणार -
मुंबई - मुंबईचा पुढील वीस वर्षाचा आराखडा सरकारने मंजूर केला असून त्याची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेने पाठवलेल्या आराखड्यातील काही भाग सरकारने मंजूर केला असला तरी दुसरा भाग अद्यापही मंजूर केलेला नाही. पालिकेने सरकारकडे पाठवण्यात आलेल्या आराखड्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. याबाबत सूचना व हरकती मागवण्यात आल्याने या बदलांसह आराखड्यातील दुसरा भाग मंजुरीसाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याची माहिती महापालिकेच्या विकास नियोजन विभागाचे अधिकारी विवेक मोरे यांनी दिली.

मुंबई महापलिकेने शहराचा वीस वर्षाचा आराखडा तयार केला होता. पन्नास हजाराहून अधिक हरकती आल्याने मुख्यमंत्र्यांनी आराखडा रद्द केला होता. पुन्हा नव्याने बनवण्यात आलेल्या आराखड्याबाबत जवळपास पाच हजार सूचना व हरकती आल्या होत्या. या सूचना व हरकतींवर सुनावणी घेत पालिकेने आराखडा मंजूर केला होता. पालिका सभागृहाने दिलेल्या २६६ व नियोजन समितीच्या २२६६ सूचनांसह आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य सरकारने आराखड्याला मंजुरी देताना नगरसेवकांच्या २६६ पैकी १०४ तर नियोजन समितीच्या २२६६ पैकी १९६६ सूचनांचा आराखड्यात समावेश केला तर ३३९ सूचना नामंजूर केल्या आहेत. यामुळे आराखड्याबाबत नगरसेवकांच्या सूचनांनाही सरकारने केराची टोपली दाखवल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

विकास आराखड्याबाबत नगर विकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पालिकेने सुचवलेल्या विविध आरक्षणामध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. राज्य सरकारने विकास आराखड्यात तब्बल २८८४ फेरबदल सुचवले आहेत. त्यावर ३० दिवसात सूचना व हरकती उपसंचालक कोंकण विभाग यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत. फेरबदलांसह आराखड्याला मंजुरी मिळण्यास पुढील चार ते पाच महिन्याचा कालावधी जाणार असल्याने विकास आराखड्यातील दुसरा भाग मंजूर करण्यास आणखी कालावधी लागणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

Post Top Ad

test