याआधी मुंबई तुंबली नव्हती का ? - मनोज कोटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2018

याआधी मुंबई तुंबली नव्हती का ? - मनोज कोटक

मुंबई - मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार असा आरोप महापौरांनी केला आहे. महापौरांच्या आरोपाचा समाचार घेताना, याआधी मुंबईत खोदकामे सुरु नव्हती त्यावेळी मुंबई कधी तुंबली नव्हती का असा थेट प्रश्न भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मेट्रोच्या कामामुळे महापौर वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच असे बेलगाम आरोप करत असल्याचे कोटक यांनी सांगितले. 

मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा आढावा महापौरांनी बुधवारी घेतला. या आढाव्यादरम्यान मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार. पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल असा आरोप महापौरांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देताना मुंबईत २६ जुलै २००५, २०१०, २०१२ ला मुंबई तुंबली होती. तेव्हा मेट्रोची कामे कुठे सुरु होती असा प्रश्न भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केला आहे. 
पालिकेकडून शहरात ब्रिमस्टोव्हेड प्रकल्पाअंतर्गत अनेक नाले रुंदीकरणाची कामे अपूर्ण आहेत. काही पंपिंग स्टेशन मुदत संपूनही पूर्ण झालेली नाहीत. जी सुरू झाली आहेत, ती चालत नाहीत. नालेसफाईचा भ्रष्टाचार भाजपा पक्षाच्यावतीने आम्ही बाहेर काढला. वजन काट्यातील मापातील पाप उघड करत त्यांना काट्यावर आणल्याचे कोटक यांनी सांगितले.

महापौरांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ते काम किती झाले हे त्यांनी सांगावे. त्यांनी नाल्यात उतरून काय पाहिले आणि काठीने गाळ कसा मापला हे सांगावे. परंतु ते न सांगता मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबेल अशी भीती महापौर व्यक्त करत आहेत. ते एकप्रकारे भ्रष्ट अभियंते आणि कंत्राटदार यांना पाठीशी घालत आहेत. अशा महापौरांना सरकार आणि मेट्रोच्या कामाबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचे कोटक म्हणाले.

मेट्रोची सुरू असलेली कामे झपाट्याने होत असल्यानेच ती डोळ्यात खुपत आहेत. त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच असे बेलगाम आरोप करत आहेत. सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधात बोलले की खमंग प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी असे आरोप होत असतात. कोट्यवधी रुपये खर्च करून जी नालेसफाईची कामे केली जात आहेत, त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची चिंता महापौरांनी करावी, मेट्रोच्या कामांकडे पाहण्यास मुख्यमंत्री सक्षम असल्याचा टोला कोटक यांनी लगावला आहे.

Post Bottom Ad