निर्माल्यावरील खर्चाच्या प्रस्तावाला ८ महिने उशिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2018

निर्माल्यावरील खर्चाच्या प्रस्तावाला ८ महिने उशिर


स्थायी समितीत खडाजंगीची शक्यता -
मुंबई - मुंबई महापालिका दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विविध चौपाट्या, तलाव इत्यादी ठिकाणाहून निर्माल्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावते. त्यासाठी केलेला खर्च स्थायी समितीच्या मंजुरीसाठी १५ दिवसात सादर करावा असा नियम असताना याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी तब्बल आठ महिने उशिरा सादर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा आदी चौपाटया आणि शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडूप इत्यादी विसर्जनस्थळी आणि ३२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी दीड दिवस ते ११ दिवसांच्या २ लाख २ हजार ३५२ गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये २८ हजार ७६४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. महापालिकेकडून या विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गोळा केलेले निर्माल्य वाहनांद्वारे वाहून नेऊन त्यापासून खतनिर्मिती करण्यात आली. या खताचा वापर उद्यानातील झाडांसाठी करण्यात आला. मात्र हे निर्माल्य वाहून नेण्यासाठी पालिकेने ३ कंत्राटदारांकडून प्रत्येकी ३ याप्रमाणे ९ टेम्पो भाड्याने घेतले होते. यासाठी पालिकेने या कंत्राटदारांना २१ लाख ३० हजार रुपये खर्च केले आहेत. याकामासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारे निविदा न काढता पालिका आयुक्तांच्या अधिकारात कंत्राट दिले होते. त्याचा खर्चही आयुक्तांनी आपल्या अधिकारात केला आहे. या खर्चाची माहिती देणारा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. निर्माल्यावरील खर्चासाठी प्रशासनाने निविदा काढली नसल्याने तसेच खर्चाबाबतचा प्रस्ताव आठ महिने उशिरा सादर केल्याने स्थायी समितीत प्रशासनानला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad