शिक्षण समितीच्या दणक्यानंतर शारदाश्रमची माघार - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

08 May 2018

शिक्षण समितीच्या दणक्यानंतर शारदाश्रमची माघार


एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू -
मुंबई - दादर येथील सुप्रसिद्ध असलेल्या शारदाश्रम शाळेने एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम बंद करून आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पालिकेच्या शिक्षण समितीमध्ये विरोध करण्यात आला होता. मराठी माध्यमाची शाळा बंद करता येणार नाही असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. तसेच शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. यानंतर शाळेने माघार घेतली असून एससी बोर्डाचे प्रवेश सुरु केले आहेत. ८, ९ आणि १० मे पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असा फलक प्रशासनाने शाळेच्या आवरात लावला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

शारदाश्रम विद्यामंदिर ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असलेली शाळा. मात्र शाळा प्रशासनाने पुढील वर्षांपासून ही शाळा ‘आयसीएसई’ या आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयसीएसई’ने निश्चित केलेला अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी यंदा चौथीतील विद्यार्थ्यांचा दाखला पालकांनी घ्यावा आणि पुढील वर्षी पाचवीसाठी शाळेत नव्याने प्रवेश घ्यावा, अशी सूचना शाळेने केली होती. मात्र याला पालकांनी विरोध केल्यानंतर तसेच पालिकेत शाळेच्या नामांतराचे पडसाद पालिकेत उमटल्यानंतर अखेर शाळा प्रशासन नरमल्याचे पहायला मिळत आहे. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यामध्ये मागील आठवड्यात बैठक झाली होती. त्यावेळी सातमकर यांनी दोन दिवसांत एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू करा असे आदेश दिले होते. तसेच २०२० पर्यंत शारदाश्रम शाळेला एसएससी बोर्डाची मान्यता असताना एसएससी बोर्ड शारदाश्रम व्यवस्थापनाकडून बंद केले जाऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले होते. तसेच शारदाश्रम शाळेच्या नामकरणाच्या प्रस्तावास आणि आयसीएई बोर्डाला शिवसेनेने तिव्र विरोध करून दोन दिवसांत विद्यार्थ्यांचे एसएससी बोर्डाचे प्रवेश न घेतल्यास पालकांसोबत शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर शाळा प्रशासनाने माघार घेत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here