पालिकेच्या ई विभाग कार्यालयात सौरऊर्जा


मुंबई - मुंबई महापालिकेचे भायखळा येथील ई विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र सौरउर्जेवर चालवले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या २५ केव्ही क्षमतेच्या सौरऊर्जा पॅनलचे उद्घाटन प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांच्या हस्ते व पालिकेतील गटनेते रईस शेख, नगरसेविका सोनम जामसुतकर, सुरेखा लोखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला परिमंडळ-१ चे उपायुक्त विजय बालमवार, ई विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड व अधिकारी उपस्थित होते. 

ई विभाग कार्यालयाच्या गच्चीवर हे सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहे. या सौरऊर्जा पॅनलमधून उत्पन्न होणाऱ्या सौरऊर्जेवर ई विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात लागणारी विजेची पूर्तता पूर्ण होईल. जी अतिरिक्त ऊर्जा निर्माण होईल ती ग्रीड सिस्टिमद्वारे युनिटप्रमाणे देण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची वर्षाला साडेचार लाखांची बचत होणार आहे. पुढील वीस वर्षांकरिता ही सौरऊर्जा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. तसेच संपूर्ण ई विभाग कार्यालय सौरऊर्जेवर चालवण्यासाठी आणखी २५ केव्हीचा प्रकल्प इमारतीच्या उरलेल्या गच्चीवर बसवण्याचा मानस आहे. त्यामुळे संपूर्ण विभाग कार्यालय सौरऊर्जेवर चालून हरित कार्यालय (ग्रीन वॉर्ड) म्हणून ई विभाग कार्यालयाची ख्याती होईल, असे नगरसेविका सोनम जामसुतकर आणि सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी सांगितले..
Previous Post Next Post