Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

‘हा विकास आहे की विनाश ?' - विखे पाटील


मुंबई - भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्‍ये विकासाचे स्‍वप्‍न दाखवून लोकांची मते घेतली. परंतू सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍यांनी विकास नव्‍हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून पुढील काळामध्‍ये भाजप सरकारला त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे संयुक्‍त उमेदवार दामोदर शिंगडा यांच्‍या प्रचारार्थ बोईसर येथील वंजारी समाज सभागृहामध्‍ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्‍यातील भाजप-शिवसेनेच्‍या सरकारवर कडाडून टीका केली. ते म्‍हणाले की, भारतीय जनता पक्ष सर्वच आघाड्यावर साफ अपयशी ठरला आहे. दिलेली आश्‍वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्‍यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्‍याचे काम त्‍यांनी सुरू केले आहे. लोकांचा विरोध झुगारूनही वाढवण बंदर, नाणार रिफायनरीसारखे प्रकल्‍प पूर्ण करण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. शिवसेना देखील भाजपच्‍या या पापात सहभागी असून, या प्रकल्‍पांना असलेला त्‍यांचा विरोध तोंडदेखला आहे. त्‍यामुळे शिवसेना कितीही नाकारत असली तरी या पापातील आपला सहभाग त्‍यांना टाळता येणार नाही.

भाजप विकास नव्‍हे तर विनाश करीत असल्‍याचा धागा धरून राधाकृष्‍ण विखे पाटील पुढे म्‍हणाले की, भाजप-शिवसेनेचे हे सरकार बुलेट ट्रेन, बडोदा एक्‍सप्रेस-वेसारखे प्रकल्‍प आदिवासींवर लादते आहे. या प्रकल्‍पांमुळे आदिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर मोठा अन्‍याय होणार असतानाही भाजप आणि शिवसेनेचे सरकार याची दखल घ्‍यायला तयार नाही. त्यामुळेच या दोन्‍हीही पक्षांच्‍या विरुध्‍द जनतेत प्रचंड रोष असल्‍याचे वारंवार दिसून आले आहे. नागरिकांमधील हा रोष लक्षात येत असल्‍याने आता भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद वापरून सत्‍ता ताब्‍यात ठेवण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीचे बहुमत असतानाही भारतीय जनता पक्षाने ऐनकेन प्रकारे आपले सरकार स्‍थापन करण्‍याचा प्रकार केला. परंतु बहुमत नसल्‍याने अडीच दिवसात ते सरकार कोसळले. तरीही भाजपने ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी हास्‍यास्‍पद भूमिका घेतली आहे. 'अच्‍छे दिन' आणण्‍याचे भाजपचे आश्‍वासन खोटे ठरले असून, आता उमेदवार सुध्‍दा इतर पक्षातून आयात करण्‍याची वेळ भारतीय जनता पक्षावर ओढवल्‍याची बोचरी टिका विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.

या सभेला काँग्रेस आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा, विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, विनायकराव देशमुख, यशवंत हाप्पे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, प्रदेश सचिव मनिष गणोरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीताताई धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिवाकरराव पाटील, बोईसर शहराध्यक्ष रणबीर शर्मा, हनुमान सिंग, अरविंद सिंग क्षत्रिय, सुभाष पाटील, संजय पाटील, मनिषाताई सावे, चंद्रकांत जाधव, जगन्नाथ पावडे, कर्णा त्रिवेदी, रामदास जाधव आदी नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom