मुंबई डुबल्यास सरकार जबाबदार - महापौर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 May 2018

मुंबई डुबल्यास सरकार जबाबदार - महापौर


मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई चांगली झाल्याचा दावा केला आहे. मात्र नालेसफाईच्या पाहणी दरम्यान नालेसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने नाराजी व्यक्त करत मुंबई डुबेल अशी भीती खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच व्यक्त केली आहे. मुंबई डुबल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा आरोप महापौरांनी केला. नालेसफाई योग्य प्रकारे न करणाऱ्या कंत्राटदारावर करावी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई सुरू आहे. मुंबईत झालेला नालेसफाई घोटाळा, मुंबईची होणारी तुंबई यामुळे सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगाने बुधवारी महापौरांनी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान शहरात मेट्रो, एमएमआरडीए आदीकडून पालिकेची परवानगी न घेताच ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत. या कामादरम्यान संबंधित प्रशासनानी पालिकेच्या मलनि:सरण व पर्जन्य जलवाहिन्यांची तोडफोड केली आहे. या वाहिन्यांची तोडफोड केल्याने मुंबईत पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी राज्य सरकार, एमएमआरडीए व मेट्रो प्रशासन जबाबदार असतील असा आरोप महापौरांनी केला. रेल्वेच्या हद्दीतही नालेसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने रेल्वेच्या परिसरात पाणी साचेल असे महापौरांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासह सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नालेसफाईची पोलखोल -  
महापौरांनी नालेसफाईच्या दौऱ्याची सुरुवात सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे येथील कला नगरपासून केली. कला नगर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र नगरमधील ज्ञानेश्वर नगर नाल्याची सफाई झाली नसल्याचे निदर्शनास आले. या नाल्याची सफाई केली जात नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नालेसफाई होत नसल्याने आमची मुले आजारी पडत असल्याचा आरोप भारत नगर येथे राहणाऱ्या सोमवती चुडीयाल यांनी केला. नाल्याची सफाई झाली नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरत महापौरांनी त्वरित नालेसफाई करा. पुन्हा दहा दिवसांनी भेट देईल तेव्हा नाले सफाई झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले. महापौर आणि पालिका अधिकारी ज्ञानेश्वर नगर नाल्याची पाहणी करत असताना एक व्यक्ती उघड्यावर शौचास बसला होता. महापौरांसमोर उघड्यावर शौच करणारा व्यक्ती पाहिल्याने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उघड्यावर शौचाला बसू नये, याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कंत्राटदाराला नोटीस - 
वाकोला नदीवरील पूलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी खड्डे खणले जात असून त्याची माती नदी पात्रात टाकली जात आहे. वाकोला नदीच्या सफाईला सुरुवात न झाल्याने महापौरांनी एम. बी. ब्रदर्सला या कंत्राटदाराला नोटीस देण्याचे आदेश दिले. इर्ला नाल्याची सफाई सुरु असल्याचे प्रशासनाकडून महापौरांना दाखवण्यात आले. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला यंत्राच्या सहाय्याने वरवरचा गाळ काढला जात होता. नालेसफाई योग्य रित्या होत नसल्याची तक्रार नगरसेवक राजू पेडणेकर, हर्षद कारकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, शितल म्हात्रे यांनी महापौरांकडे केली. यावर नालेसफाई होत असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. नालेसफाई कामाच्या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ काढून त्याच नाल्यात पुन्हा टाकण्यात येत असल्याचे तसेच नालेसफाई करताना नाल्यातील वरवरचा कचरा काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

नगरसेवकांना महापौरांनी झापले - 
नालेसफाईची पाहणी दौऱ्यास सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी दांडी मारली. नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना त्याविभागातील शिवसेनेचा नगरसेवक उपस्थित नसल्याने महापौर संतापले होते. एका नगरसेवकाला महापौरांनी स्वतः फोन लावून तुला आजचा दौरा माहित नव्हता का ? माहीत होता तर का आला नाहीस ? तुला बोलवायला घरी निमंत्रण घेऊन येऊ का ? असे चांगलेच झापले. महापौरांनी संतप्त होत नगरसेवकाला झापल्याची माहित नगरसेवकांपर्यंत गेल्याने पुढील नालेसफाई पाहणी दरम्यान नगरसेवक जातीने हजर होते.

Post Top Ad

test