महापालिकेचे आता स्वतंत्र 'पशुवैद्यकीय आरोग्य खाते' - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

28 May 2018

महापालिकेचे आता स्वतंत्र 'पशुवैद्यकीय आरोग्य खाते'


मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्यरत असणा-या सार्वजनिक आरोग्य खात्याप्रमाणेच महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र 'पशुवैद्यकीय आरोग्य खाते' (Veterinary Health Department) सुरु केले आहे. त्याला महापालिकेच्या  आरोग्य समितीने व त्यानंतर सभागृहाने देखील नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे आता पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्यासाठी देण्यात येणा-या विविध सेवा सुविधा एकाच छताखाली आल्याने याविषयीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार असल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन यांच्या मार्गदर्शनानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याची रचना करण्यात येत आहे. पशु आरोग्याशी मानवाचे आरोग्य निगडित असते. यामुळेच प्राण्यांच्या अनारोग्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर देखील होण्याची शक्यता असते. माणसाला होणा-या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशुचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून माणसाला होतात. या आजारांना 'झूनॉटिक डिसिजेस' असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रॅबीज, ऍन्थ्रॅक्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यासारख्या आजारांचा समावेश होतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना पशुवैद्यकीय बाबींचा व पशुआरोग्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे आहे. या खात्याच्या अंतर्गत अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राण्यांपासून माणसांना होणा-या रोगांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा (Zoonotic Diseases), देवनार पशुवधगृह, प्राणी-गणना,श्वान नियंत्रण कार्यालय (Dog Control Office), श्वान निर्बिजीकरण, श्वान अनुज्ञप्तीपत्र (Dog License), कुत्रे व मांजरांसाठी स्मशानभूमी, गुरे कोंडवाडा विभाग इत्यादींचा समावेश असणार आहे. वर्ष २०१२ मध्ये करण्यात आलेल्या एकोणिसाव्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव जनावरे आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. या व्यतिरिक्त मनपा क्षेत्रात भटक्या जनावरांची संख्या देखील मोठी आहे. या पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या आरोग्याबाबत अथवा रोगांबाबत तपशील संकंलित करण्यासही स्वतंत्र खात्यामुळे चालना मिळणार आहे.अशी माहिती शेट्ये यांनी दिली.

पशुवैद्यकीय रुग्णालय - 
महालक्ष्मी परिसरात उभारण्यात येणारे अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय देखील पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या अंतर्गत असणार आहे. 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (BOT) या तत्वावर बांधण्यात येणा-या या रुग्णालयात प्राण्यांसाठी सीटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, क्ष-किरण या सारख्या सुविधांसह अद्ययावत 'ऑपरेशन थिएटर' असणार आहे. या रुग्णालयात एकावेळी ३०० छोट्या प्राण्यांना (कुत्रे, मांजरी इत्यादी) दाखल करण्याची सुविधाही असणार आहे.

श्वान नियंत्रण कार्यालय व प्राणी स्मशानभूमी - 
महापालिका क्षेत्रातील भटके श्वान पकडण्याची व त्यांचे निर्बिजीकरण करण्याविषयीची जबाबदारी असणारी महालक्ष्मी, वांद्रे (प), मालाड (प) व मुलुंड (प) येथील ४ श्वान नियंत्रण कार्यालये (Dog Control Office) देखील याच खात्याच्या अंतर्गत येणार आहेत. तसेच मालाड (पश्चिम) परिसरात सध्या असणारा गुरांचा कोंडवाडा व या शेजारीच उभारण्यात येणारा पशुवैदयकीय दवाखानाही पशुवैद्यकीय आरोग्य खात्यांतर्गत असेल. त्याचबरोबर श्वान व मांजरी यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या दृष्टीने महालक्ष्मी, देवनार व मालाड(पश्चिम) येथे प्रत्येकी एक याप्रमाणे ३ सीएनजी आधारित प्रस्तावित स्मशानभूमी (incinerator / crematorium) या बाबीही याच खात्यांतर्गत असणार आहे.

Post Top Ad

test