मे महिन्यात दररोज 73 हजार वाहने विकली

JPN NEWS
नवी दिल्ली- यावर्षी मे महिन्यात भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे दिसून आले. मे महिन्यात 22.82 लाख वाहने विकली गेली म्हणजेच या महिन्यात दररोज 73 हजार 632 वाहने विकली गेली आहेत. सार्वजनिक वाहतुकीची वाहनं, व्यावसायिक वाहनं, दुचाकी या सर्वांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मे 2017 पेक्षा या वर्षी वाहनांच्या विक्रीमध्ये 12.13 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये 20.35 लाख वाहने विकली गेली होती. भारतीय वाहन उत्पादक संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये हे चित्र स्पष्ट झाले आहे. 

गेल्या महिन्यात कार आणि प्रवासी वाहने 3.01 लाख इतकी विकली गेली. एप्रिलमहिन्यापेक्षा त्यात 19.65 टक्के वाढ झाली आबे. होंडा आणि टोयोटा कंपन्यांनी नव्या कार बाजारात आणल्यामुळेही या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आली असे भारतीय वाहन उत्पादन संस्थेच्या अहवालातून दिसते. 2017 च्या मे महिन्यात 1.66 लाख कारची विक्री झाली होती. मे महिन्यात 82,086 एसयूव्ही गाड्यांची विक्री झाली तर 19,673 व्हॅन्सची विक्री झाली. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये 43.06 टक्के इतकी मोठी वाढ झाली असून केवळ एका महिन्यामध्ये 76,478 व्यावसायिक वाहनं विकली गेली आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 53 हजार 457 व्यावसायिक वाहनं विकली गेली होती.
दुचाकींचा विचार केल्यास गेल्या वर्षातील मे महिन्यापेक्षा यंदाच्या मे महिन्यात दुचाकींच्या विक्रीमध्ये 9.19 टक्के वाढ झाली . एका महिन्यात 18.50 लाख दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी मे महिन्यात 16.94 लाख दुचाकी विकल्या गेल्या होत्या. स्कूटर्सची विक्री मात्र गेल्या 15 महिन्यांमध्ये प्रथमच घटली असून 5.55 लाख स्कूटर्स मे महिन्यात विकल्या गेल्या. वाहनांच्या निर्यातीत 23.84 टक्के वाढ झाली आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !