महिलांना रिक्षासाठी पालिकेने ५० टक्के अर्थसहाय्य करावे

JPN NEWS
मुंबई - महिला सक्षमीकरणासाठी दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत ज्या महिलांनी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा महिलांना पालिकेने रिक्षासाठी ५० टक्के अर्थसहाय्य करावे अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे. रिक्षाच्या किमतीपैकी ५० टक्के त्या भरतील व ५० टक्के पालिका या अटीवर रिक्षाचे वाटप करण्यात यावे, असे ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.

मुंबईतील गरीब महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी पालिका जेंडर बजेट च्या माध्यमातून महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी महिलांना शिवण यंत्र ,घरघंटीचे वाटप करण्यात येते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात या साधनांव्दारे मिळणारे उत्पन्न मर्यादित व अपुरे आहे. कौशल्य विकास साधण्याकरिता दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत महिलांना व्यक्तिगत स्तरावर वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.. या प्रशिक्षणाचा स्वयंरोजगाराकरिता योग्य विनियोग व्हावा यासाठी पालिकेने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशिक्षित महिलांना रिक्षासाठी पालिकेने ५० टक्के अर्थसहाय्य करावे. महिलांना रिक्षाच्या किमतीपैकी ५० टक्के त्या भरतील व ५० टक्के पालिका या अटीवर रिक्षाचे वाटप करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल य़ांनी केली आहे. य़ेत्या पालिका सभागृहात ही सूचना मंजुरीसाठी येणार आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !