Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी

मुंबई - पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू,लेप्टोस्पायरोसिस यासंदर्भात उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पावसाळ्यात मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्या वाढते. विशेष करून समुद्र किनारपट्टी लगतच्या भागात या आजाराचे रुग्ण आढळतात. गेल्या वर्षी राज्यातील १४ जिल्ह्यात ३९८ जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती. मात्र गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे आणि रुग्णांना देण्यात आलेल्या डॉक्सिसायक्लीन औषधामुळे लेप्टोस्पायरोसिस आटोक्यात आला. शिवाय मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही अशाच प्रकारे मोहिम हाती घेऊन लेप्टो आटोक्यात आणावा. यंदा मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील १९ रुग्णांना लागण झाली आहे. मात्र एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

राज्यात यावर्षी जानेवारी ते जूनदरम्यान सुमारे आठ लाख रुग्णांची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यातील बाधित रुग्णांची संख्या ३४ आहे. सुमारे ९ हजार संशयित रुग्णांनी ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईत ४३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सध्या मुंबईत स्वाईन फ्लूचा रुग्ण नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जुलै ते ऑगस्ट याकाळात स्वाईन फ्लूचा उद्रेक वाढतो. याकाळात यंत्रणांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करतानाच स्वाईन फ्लूच्या चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांनी अवाजवी दर आकारू नये यासाठी परिपत्रक काढण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. संपूर्ण स्वाईन फ्लू उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राज्यभर खासगी डॉक्टरांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे, असेही त्यांनी सांगितले.

डेंग्यूबाबत आढावा घेताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, महापालिकांनी आपल्या क्षेत्रात स्वच्छता आणि साफसफाई मोहिम हाती घ्यावी. महापालिकेने जी दंडात्मक कारवाई केली आहे त्यामुळे डेंग्यू अळ्यांची पैदास केंद्रे नष्ट होण्यास मदत झाली आहे. परिणामी मुंबई महानगरात डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबई महापालिकेची ही कार्यपद्धती राज्यातील अन्य महापालिकांनी अनुसरावी जेणेकरून डेंग्यू डासांच्या अळ्यांवर प्रतिबंध होऊ शकेल. ज्या भागात बांधकाम सुरू आहे तेथे पावसाळ्यात पाणी साठून डेंग्यू डासांची पैदास केंद्र होऊ नये यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. ज्या बांधकाम साईटवर अशा प्रकारची दक्षता घेतली जाणार नाही त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, नांदेड, ठाणे, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून त्याच्या प्रभावी उपाययोजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जुलैपासून हत्तीरोग रात्र चिकित्सा केंद्र सुरू करण्याचे निर्देश यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रातील स्वाईन फ्लू, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ. संजीवकुमार, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom