अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन पथके तैनात

JPN NEWS

पाण्याचा निचरा करण्यासाठी तब्बल ५३६ पंप कार्यरत -
मुंबई - राज्यात आठवडाभर पाऊस पडणार असताना मुंबईत ८ ते १० जून दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा होण्याचा ईशारा दिला असल्याने मुंबई महापालिका व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहेत. अतिवृष्टी झाल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी पहिल्यांदाच शहरात ५३६ पंप लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व व्यवस्थापनांना आपली आपत्कालीन व्यवस्थापन पथके तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्यांदाच शहरातील ६ पम्पिंग स्टेशनमधील समन्वय व्हॉट्स ऍप ग्रुप द्वारे राखला जाणार असल्याची माहीत महापालिकेकडून देण्यात आली.

मुंबईत पावसाळयादरम्यान २२५ ठिकाणी पाणी साचते. या ठिकाणी पाणी साचू नये व पाण्याचा निचरा त्वरित करता यावा म्हणून मुंबई महापालिकेकडून २९५ पंप बसवण्यात आले आहेत. शहरात मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचल्यास त्याला मेट्रो व राज्य सरकार जबाबदार असतील असे महापौरांनी ठणकावले होते. या अनुषंगाने ज्याठिकाणी पाणी साचू शकते, अशा ठिकाणी मेट्रो रेल्वेद्वारे २४१ पंप बसविण्यात आले आहेत. शहरात पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही यंत्रणांकडून पहिल्यांदाच महापालिका व मुंबई मेट्रो रेल्वे यांच्याद्वारे शहरात एकूण ५३६ पंप बसविण्यात आले आहेत. मागील वर्षी १५५ ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर झाला नव्हता. त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या असून त्यापैकी ५५ ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. शहरात साचलेल्या पाण्याचा तीव्र गतीने निचरा व्हावा म्हणून पालिकेची ६ पम्पिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत. या उदंचन केंद्रांमधून दर सेकंदाला तब्बल २ लाख ३४ हजार लीटर पाणी शहरा बाहेर टाकता येणार आहे.

मुंबईत होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या खातेप्रमुखांच्या सुटया रद्द करण्यात आल्या असून त्यांना आपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील अधिका-यांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना आणीबाणी परिस्थिती उध्दभवल्यास नागरिकांच्या तात्पुरत्या निवा-याकरिता तात्पुरते निवारे म्हणून घोषित करण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळा काळजीवाहू कर्मचा-यांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम हे ऍप व dm.mcgm.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. याद्वारे नागरिकांना पाऊसासंबंधीची सर्व माहिती दिली जाणार आहे. पावसाळ्यात वीज जाण्याच्या अनेक तक्रारी येतात त्यासाठी महावितरण, रिलायन्स एनर्जी, बीईएसटी (विद्युत पुरवठा) यांना आणीबाणी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बचाव पथके सज्ज - 
अग्निशमन निंयंत्रण कक्ष, तटरक्षक दल, दोन्ही रेल्वे नियंत्रण कक्ष, बीईएसटी नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष यांना वेधशाळेचा इशारा कळवून सतर्क रहाण्याच्या तसेच आपआपली आणीबाणी मदत पथके सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाची पूर बचाव पथके अग्निशमन दलाच्या सहा प्रादेशिक केंद्रावर आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी शहर भागाकरिता शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र परळ येथे, पश्चिम उपनगराकरिता अंधेरी क्रिडा संकुल येथे व पूर्व उपनगराकरिता मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे पूर बचाव साहित्यासह तैनात करण्यात आले आहे. नौदलाची पथके कुलाबा, वरळी, घाटकोपर, मालाड, ट्रॉम्बे येथे तैनात ठेवण्यात आले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बृहन्मुंबईतील सहा समुद्रांवर सुरक्षितेच्या दृष्टीने अग्निशमन दल, पोलीस, शहर आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या जवानांना ८ जून पासून तैनात करण्यात येणार आहे.

व्हॉट्स ऍप ग्रुप - 
पाण्याचा निचरा करणाऱ्या शहरातील ६ पंपिग स्टेशनमध्ये समन्वयन व नियंत्रण करता यावे यासाठी ४ उपायुक्त, ८ विभागांचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या), उपप्रमुख अभियंता, पंपिग स्टेशनशी संबंधित २ कार्यकारी व ४ सहाय्यक अभियंता यांच्यासह पंपिग स्टेशनशी संबंधित कंत्राटदारांचे वरिष्ठ तांत्रिक प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र व्हॉट्स ऍप ग्रुप सुरु करण्यात आला आहे. सर्व ६ पंपिग स्टेशनच्या संबंधित अधिका-यांनी त्यांच्या पंपिग स्टेशनशी संबंधित आवश्यक ती सर्व माहिती नियमितपणे या ग्रुपवर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जूनमधील हे दिवस धोकादायक - 
हवामान विभागाने ८ ते १० जून या दिवशी अतिवृष्टीचा ईशारा दिला असला तरी त्यानंतर १३ ते १८ जून असे सहा दिवस समुद्राला मोठी भरती (हायटाईड) आहे. १३ जूनला दुपारी ११ वाजून ४३ मिनिटांनी ४.६८ मीटर, १४ जूनला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी ४.८५ मीटर, १५ जूनला दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी ४.९२ मीटर, १६ जूनला दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी ४.९१ मीटर, १७ जूनला दुपारी २ वाजून ५६मिनिटांनी ४.८२ मीटर तर १८ जूनला दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी ४.६५ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे या दिवशी नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !