Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतरच्या ५ दिवसांत भाजप नेत्यांशी संबंधित गुजरातमधील ११ जिल्हा सहकारी बँकांत सुमारे ३११८.५१ कोटींच्या बाद नोटांचा भरणा झाल्याचा दावा काँग्रेसने शुक्रवारी आरटीआय अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीचा दाखला देत केला. 'नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून, याद्वारे हजार कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला', अशी टीका काँग्रेसने या प्रकरणी केली आहे.

मनोरंजन एस. रॉय नामक एका आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत उपरोक्त माहिती मागवली होती. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी या माहितीच्या आधारावर केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली. तद्नंतरच्या ५ दिवसांत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत (एडीसीबी) सर्वाधिक ७४५.५९ कोटींच्या बाद नोटा जमा करण्यात आल्या. भाजप अध्यक्ष अमित शाह हे या बँकेच्या संचालक मंडळावर आहेत, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 'एडीसीबी'नंतर गुजरातचे कॅबिनेट मंत्री जयेशभाई विठ्ठलभाई रदेदिया चेअरमन असलेल्या राजकोट जिल्हा बँकेतही ६९३.१९ कोटींच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या. राजकोट हा गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. येथूनच पंतप्रधान मोदी २००१ साली सर्वप्रथम विधानसभेवर पोहोचले होते. त्यामुळे नोटाबंदी नेमकी कुणासाठी करण्यात आली हे स्पष्ट होते, असे काँग्रेसने म्हटले आहे. या २ बँकांसह सूरत जिल्हा सहकारी बँकेत ३६९.८५ कोटी, साबरकांठा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत ३२८.५० कोटी, बनासकांठा जिल्हा बँकेत २९५.३० कोटी, मेहसाना २१५.४४ कोटी, अमरेली जिल्हा सहकारी बँकेत २०५.३१ कोटी, भरूच जिल्हा बँकेत ९८.८६ कोटी, बडोदा केंद्रीय सहकारी बँकेत ७६.३८ कोटी, जुनागढ जिल्हा बँकेत ५९.९८ कोटी आणि पंचमहाल जिल्हा बँकेत ३०.१२ कोटींच्या बाद नोटा जमा करण्यात आल्या, असे काँग्रेसने म्हटले आहे.

नोटाबंदीनंतर गुजरातमधील राज्य सहकारी बँकांत ११०.८५ कोटी; तर जिल्हा सहकारी बँकांत ३६४०.३३ कोटी रुपये जमा करण्यात आले. भाजपशासित व त्याच्या मित्र पक्षांची सत्ता असलेल्या १८ राज्यांतील जिल्हा बँकांत १४,२९३.७१ कोटींच्या बाद नोटा जमा करण्यात आल्या. तर बिगर भाजप पक्षांची सरकारे असलेल्या १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत २२२७०.८ कोटींची रक्कम जमा झाली, असेही काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom