ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी मार्च २०१९ ची डेडलाईन - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2018

ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी मार्च २०१९ ची डेडलाईन


मुंबई - ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम अनेक वर्ष रखडले आहे. या मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळ खारफुटीच्या झाडांमध्ये नवीन पूल बांधण्याच्या परवानगीसाठी पुन्हा वनविभागाकडे पत्र पाठवण्यात आले आहे. या मार्गांसाठी येत्या मार्च २०१९ ची डेडलाईन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी एमआरव्हीसीला दिलेली आहे. 

ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचवा-सहावा रेल्वेमार्ग टाकण्यात येत आहे; परंतु खारफुटीमुळे हे काम खोळंबले आहे. एमआरव्हीसीने नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाकडे खारफुटीची झाडे तोडून तेथे पूल उभारण्याची परवानगी मागितली आहे. याजागी एमआरव्हीसीला ४०० मीटर लांबीचा पूल उभारायचा आहे. याआधी हा मार्ग उभारण्यासाठी एमआरव्हीसीने पारसिक बोगद्यात सध्या अस्तित्वात असलेल्या धिम्या मार्गाच्या बाजूला नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्याचा निर्णय घेतला होता; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे पारसिक बोगद्यात ५ वा आणि ६ वा रेल्वेमार्ग टाकणे अशक्य असल्यामुळे नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पूल उभारण्यासाठी खारफुटीची झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी वनविभागाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. अद्यापि वनविभागाची परवानगी एमआरव्हीसीला मिळालेली नाही. तर दुसरीकडे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी मार्च महिन्यापर्यंत हा मार्ग पूर्ण करा, असे आदेश एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. वनविभागाची परवानगी मिळाल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी नवीन पूल उभारण्यासाठी लागणार आहेत, त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत ५-६ वा रेल्वेमार्ग कसा तयार होणार, असा प्रश्न एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. एमयूटीपी-२ अंतर्गत हा प्रकल्प आखण्यात आला होता. कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान ५-६ व्या रेल्वेमार्गांचे काम पूर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरून करणे सोयीचे होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान टाकण्यात येत असलेले ५-६ वे रेल्वेमार्ग हे ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडून आले. या मार्गांनंतर जलद गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे. या मार्गाचे काम रखडल्याने १३० कोटींचा प्रकल्प आता ४२० कोटींवर गेला आहे. मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad