एसी लोकलमधील बिघाडामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2018

एसी लोकलमधील बिघाडामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट


मुंबई - पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी एसी लोकल अचानक रद्द केल्याने एसी लोकलच्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. तसेच प्रकार आजही झाला. सकाळी एसी लोकलच्या तीन डब्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी लोकलची आपत्कालीन चेन ओढून लोकल थांबवली होती. एसी लोकलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

शुक्रवारी सकाळी बोरिवलीहून चर्चगेटसाठी निघालेली एसी लोकल अंधेरी स्थानकात येताच प्रवाशांनी या लोकलची चेन ओढून ती थांबवली. एसी लोकलमधील तीन डब्यांत एसी यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे व्हेंटिलेशनचा त्रास प्रवाशांना होत होता. त्यामुळे प्रवाशांनी चेन ओढून लोकल थांबवली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ही लोकल रद्द करुन कारशेडला दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली.एसी लोकलमध्ये बिघाड झाला असून ती दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठविण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना कळविले होते. एसी लोकलच्या दिवसभरात १२ फे ऱ्या चालवण्यात येतात. सकाळच्या दोन फेऱ्या चालवण्यात आल्यानंतर शुक्रवारी दिवसभरातील ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एसी लोकलच्या फेऱ्या पुन्हा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या. संध्याकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी एसी लोकल चर्चगेटहून रवाना करण्यात आली; परंतु वारंवार एसी लोकलच्या एसी यंत्रणेत बिघाड होत आहे. दर आठवड्यामध्ये एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याकारणाने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad