आयुष्यमान भारत योजनेसाठी २४ तास कॉल सेंटर्स, ११ कोटी कुटुंब कार्डे

JPN NEWS
नवी दिल्ली - आयुष्यमान भारत या योजनेसाठी भारत सरकार सुमारे ११ कोटी इतक्या कुटुंबांसाठी कार्ड छापणार असून ही कुटुंब कार्डे त्या लाभार्थींना पोहोचवण्यात येणार आहेत. सरकार गावांमध्ये त्या योजनेखाली आयुष्यमान पंधरवडा आयोजित करणार असून त्या वेळी तेथे त्या त्या कुटुंबांना ही कार्डे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी २४ तास कॉल सेंटर्सही असतील व त्याद्वारे लोकांना मदत केली जाईल. वैद्यकीय विमा योजनेशी संलग्न असणाऱ्यांच्या तक्रारीही ऐकल्या जातील व त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही या कॉल सेंटरवर दिली जाणार आहेत.

आयुष्यमान भार-नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीमचे (एबी-एनएचपीएम) मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी सांगितले की, येत्या १५ ऑगस्टपर्यंत सरकार योजनेसाठी सर्व तयारी करत आहे. मात्र, ही योजना कोणत्या दिवशी नेमकी सादर केली जाणार आहे, ते त्यांनी सांगितले नाही. योजनेअंतर्गत कुटुंब कार्डे या योजनेच्या पात्र सदस्यांच्या नावावर दिली जातील. त्यातील प्रत्येक व्यक्तीला पत्र दिले जाईल व त्यात योजनेच्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती दिलेली असेल. ग्रामीण भागात ८० टक्के व शहरी भागात ६० टक्के लाभार्थींना ही कार्डे दिली जाणार आहेत, असे स्पष्ट होते..

या कॉल सेंटरना राष्ट्रीय टोलमुक्त क्रमांकावर कॉल करता येईल. या केंद्रामधून नागरिकांना ई-मेल व ऑनलाईन चॅटद्वारेही उत्तरे दिली जाणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी सेवा देणाऱ्या कंपनीची निवडही पुढील महिन्यापर्यंत केली जाणार आहे. देण्यात येणाऱ्या कार्डाद्वारे ओळख प्रक्रियाही सोपी होणार आहे. मात्र, लोकांना ओळखीसाठी आपल्या अन्य आवश्यक कागदपत्रांनाही सादर करावे लागणार आहे. आयुष्यमान योजनेसाठी पात्र आहेत की नाहीत, याबाबतची अनभिज्ञता आम्हाला संपुष्टात आणावयाची आहे. कुटुंबांना ते समजले पाहिजे की ते या योजनेमध्ये पात्र आहेत की नाहीत तसेच त्यांना यासाठी सेवा कुठून मिळू शकेल, हे ही समजले पाहिजे, असे इंदू भूषण यांनी सांगितले..

या योजनेच्या एका प्रस्तावित माहितीनुसार रोज पाच लाख पत्रे जारी करण्याचा विचार आहे, त्यामुळे १०.७४ कोटी माहिती पत्रे व कुटुंब कार्डे छापणे व वितरणाला दोन वर्षे जातील, असा हिशेब होतो. या संबंधात पत्र छापण्यासाठी दोन वर्षे लागणार नाहीत, असे सांगत इंदु भूषण म्हणाले की, पात्र कुटुंबांना पत्रे पोहोचली नाहीत तरी त्यांना या सेवेला अपात्र म्हणून घोषित केले जाणार नाही.
Tags