बिबटयाच्या हल्ल्यात तरुण जखमी

JPN NEWS

मुंबई - मुलुंडच्या राहुल नगर भागात बिबट्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजता एका तरुणावर हल्ला केला आहे. सुरज गवई (२९ वर्षे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरजच्या घराबाहेर कुत्रा बांधलेला होता. मध्यरात्री दोन वाजता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून सुरजने दरवाजा उघडला. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने डोळ्यावर पंजा मारल्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पापणीचा भाग फाटला असून चेहरा सुजलेला आहे. त्याला जखमी अवस्थेत पहाटे चार वाजता त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी अकरा ते दीड वाजेपर्यंत त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जरीच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. या हल्ल्यात सुरजच्या डोक्यालाही इजा झाली आहे. सूरज एका खासगी कुरिअर कंपनीमध्ये कामाला आहे. कुत्र्याची शिकार करण्यासाठी इथे कायम बिबटे येथे येतात. त्यांचा वावर वाढता असल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण असते, असे सुरजचे भाऊ जयेश गवई यांनी सांगितले. याआधी मुलुंडच्या नानेपाड्यात बिबट्याने अशाप्रकारे हल्ला केला होता. त्यातही सहा जण गंभीररित्या जखमी झाले होते. 
Tags