
एका घमेल्यात वीटा, पेव्हर ब्लॉक भरायचे, ते घमेले स्कुटीवर ठेवायचे, दिसला खड्डा की थांबायचे...विटांचा भुगा करायचा, भुग्याचा थर खड्ड्यात टाकायचा, पेव्हर ब्लॉक पद्धतशीरपणे लावायचे, खड्डा भरला की पुन्हा दुसऱ्या खड्ड्याकडे मोर्चा वळवायचा असा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या या कामात माहीममधील काही रहिवासीही त्यांना साथ देत आहेत. मुख्यत: माहीम ते वांद्रे परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम ते करतात. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे बुजवणे शक्य होत नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे बुजवले जातात असे या दोघांनी सांगितले.