अंधेरीचा गोखले पूल कोसळलाच कसा ? - महापौर

मुंबई - मागील वर्षी २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन पुलावर घडलेल्या दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून चर्चगेट ते विरारपर्यंतच्या सर्व फ्लाय ओव्हर आणि फुटओव्हर ब्रिजची तपासणी केली. या तपासणीत सर्व पुल ‘सुस्थिती’त असल्याचा अहवाल देण्यात आला. असे असताना मंगळवारी अंधेरीचा गोखले पूल कोसळलाच कसा, असा सवाल करीत ‘रेल्वे’च्या स्ट्रक्चरल ऑडिटची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पोलखोल केली. 

अंधेरी पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर महापौर महाडेश्वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वे मार्गावर ८८ पादचारी पूल असून अन्यत्र २१ पूल आहेत. तर मध्य रेल्वेवर मुंबई विभागात १३४ पादचारी पूल आहेत. या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी रेल्वे प्रशासनाला दिला जातो. असे असताना पुलांची निगा का राखली जात नाही, असा सवाल यावेळी महाडेश्वर यांनी उपस्थित केला. संबंधित पुलाच्या देखभालीची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. 

चार वर्षांत १०३ कोटी दिले -
रेल्वे मार्गावरील फ्लाय ओव्हर ब्रिज आणि पादचारी पुलांची देखभाल पालिका करीत नाही. मात्र या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला कोट्यवधीचा निधी दिला जातो. यामध्ये गेल्या चार वर्षांत पश्चिम रेल्वेला ११ कोटी २५ लाख तर मध्य रेल्वेला ९२ कोटी पालिकेने दिले असल्याची माहिती महापौर महाडेश्वर यांनी दिली.
Tags