मुंबईत पावसाची हॅट्रिक

मुंबई - सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. साचलेले पाणी, वाहतुकीची कोंडी आणि रेल्वेच्या खोळंब्यामुळे चाकरमान्यांची दाणादाण उडाली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्य दर्शनही झाले नाही. सायन, माटुंगा, हिंदमाता, किंगसर्कल येथे गुडघाभर पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले. नोकरदारांना कार्यालय व संध्याकाळी घर गाठण्यासाठी दमछाक झाली. येत्या 24 तासांत मुंबईसह राज्यभरांत अटीवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत मागील तीन दिवसांपासून पडणा-या पावसाने मुंबईला अक्षरक्षः झोडपून काढले. पहाटेपासूनच पाऊस जोरदार बरसल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचून रस्ते जलमय झाले. हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, दादर येथे गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. येथे बेस्टच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याने अनेकांना गुडघाभर पाण्यातून कसरत करून प्रवास करावा लागला. अंधेरी सबवे, मिलन सबवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोडवरील वाहतूकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चेंबूर येथील लोखंडे मार्ग, किंग्ज सर्कल, सायन येथे तलावाचे स्वरुप आले होते. मुंबईत गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेने १८२ मिमी पावसाची तर सांताक्रुझ वेध शाळेने १३७ मिमी पावसाची नोंद केली आहे. तर सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत कुलाबा 78.06 मिमी तर सांताक्रुझ येथे 68.01 मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी 8.56 वाजता 3.69 मीटरची भरती व दुपारी 2.30 वाजता 2.12 मीटरची ओहोटी होती. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलाव क्षेत्रातही जोरदार पाऊस पडला. तुळसी तलाव ओव्हरफ्लो झाला. इतर तलावातही ब-यापैकी पाणीसाठा जमा झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा वेधशाऴेने दिला आहे. मुंबईत खबरदारी म्हणून विभागीय सहाय्यक आयुक्तांना तात्काळ आपआपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेने 5 हजार पेक्षा जास्त कामगार तैनात केले आहेत. 

विक्रमी पाऊस -
मुंबईत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पडणा-या सरासरी पावसाच्या 54 टक्के पाऊस 8 जुलैपर्यंत पडला असून हा पाऊस फक्त 20 दिवसांतला पडलेला पाऊस आहे.

साचलेले पाणी खेचण्यासाठी 37 पंप लावले --
पाच पंपिंग स्टेशनवरील 37 पंप सुरु करण्यात आले होते. या पंपाने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. या पावसाळ्यात 37550 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा निचरा करण्यात आला असून तो विहार व तुळसी तलावाच्या पाणीसाठ्यापेक्षा म्हणजेच 35744 लिटरपेक्षा अधिक आहे.

सर्वाधिक पावसाची नोंद --
महापालिका मुख्यालय येथे 203 मिमी, कुलाबा पंपिंग 190 मिमी, वरळी 180 मिमी, मुलुंड, 126 मिमी, घाटकोपर 119 मिमी, भांडुप 118 मिमी, मरोळ 172 मिमी, कांदिवली 162 मिमी, वर्सोवा 140 मिमी या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

समुद्र किना-यावर सुरक्षा -
नागरिक, पर्यटकांनी समुद्रात पाण्यात जाऊन काही दुर्घटना घडू नयेत याकरीता सहा समुद्र किना-यांवर 36 जीवरक्षक, अग्निशमन दलाची पूर बचाव पथके, शहर आपत्ती प्रतिसाद पथकाचे सुरक्षा रक्षक आवश्यक त्या साधन सामुग्रीसह तैनात करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मागील 24 तासांत पडझडीच्या घटना -
मागील 24 तासांत पडलेल्या मुसळधार पावसात 32 ठिकाणी शॅार्टसर्किटच्या घटना घडल्या. तर 23 ठिकाणी झाडे व 11 ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या.

तुळशी तलाव ओव्हरफ्लो -
मुंबईला पाणिपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव सोमवारी सकाळपासून भरून वाहू लागला. दरवर्षी हा तलाव जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भरतो. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 139.17 मीटर असून ही पातळी तलावाने सोमवारी गाठली. मुंबर्इला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सध्या सातही तलाव क्षेत्रात 5 लाख 50 हजार 601 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हे पाणी 136 दिवसांसाठी म्हणजेच साडेचार महिन्यांसाठी पुरेल इतका साठा आहे.
Tags