समाज परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात यावे - आमदार प्रणिती शिंदे

नागपूर - आज राजकारणात युवकांना मोठी संधी आहे. राजकारणात येऊन समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

48 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अवर सचिव सुनील झोरे तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाल्या, राजकारणात येण्याअगोदर 2004 साली जाई-जुई संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. समाजकारणासाठीच राजकारणात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाची एकता हीच देशाची शक्ती आहे. महापुरुषांच्या विचाराचे प्रसारण एका चौकटीत न ठेवता ते प्रसारीत करणे हे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे. मी एक भारतीय आहे. प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान बाळगून देशाची अखंडता राखण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे. असे त्या म्हणाल्या.

आजही महिला वरिष्ठ पदावर गेलेल्या पुरुषांना आवडत नाही. महिलांविषयी युवकांनी आदर ठेवला पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याशिवाय महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांबद्दल असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

युवकांमध्ये संवाद खूप महत्वाचा असून यामधून खूप काही शिकता येऊ शकते. महिलांना आरक्षण दिले गेले आहे. राजकारणात येण्यासाठी अनेक पक्ष आहेत. या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात येऊ शकतात. याविषयी युवकांनी मानसिकता बदलायला हवी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.