नादुरुस्त ट्रायमॅक्स मशीनमुळे बेस्टला आणखी सहा महिने आर्थिक नुकसान


मुंबई - बेस्टमध्ये तिकीट वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रायमॅक्स मशीनमुळे बेस्टला दिवसाला ५० ते ६० लाख रुपयांचा तोटा होतो, तरीही या ट्रायमॅक्स मशीनचा करार पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला तिकिटासाठी नादुरुस्त ट्रायमॅक्स मशीनचा वापर करून आणखी सहा महिने बेस्टला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सहा महिने मुदतवाढीसाठी हा प्रस्ताव येईल, अशी चर्चा होती. मात्र, समिती सदस्यांपुढे प्रस्ताव सहा महिने मुदतवाढीसाठी आलाच नाही. त्यातच ३० जूनला मुदतीचा करार संपुष्टात आला व प्रशासनाने समिती सदस्यांच्या मंजुरी विनाच ट्रायमॅक्स मशीनला पुढील सहा महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे प्रशासन व समिती सदस्य यांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.

ट्रायमॅक्स कंपनीला २०१० मध्ये मंजुरी देण्यात आली होती. २०१० ते २०१६ दरम्यान या कंत्राटाचा कालावधी होता. २०१६ ट्रायमॅक्सची मुदत संपल्यावर नोव्हेंबर २०१६ मध्ये दुसरे कंत्राट काढण्यात आले होते. हे कंत्राटही ट्रायमॅक्स कंपनीलाच देण्यात आले. पूर्वीच्या कंत्राटाची मुदत ऑक्टोबर २०१६ मध्ये संपली. मात्र, बेस्ट उपक्रमाची तिकीट व्यवस्था कार्यान्वित ठेवणे आवश्यक असल्याने व मासिक देयकाची रक्कम प्रदान करणे आवश्यक असल्याने तसेच हा प्रकल्प हस्तांतरित करण्याकरिता या कंत्राटाचा कालावधी १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जून २०१८ पर्यंत विस्तारित करण्यात आला होता. मात्र, या कालावधीत नादुरुस्त मशीनमुळे बेस्टला दिवसाला लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते, असा आरोप अनेकवेळा बेस्ट समिती बैठकीत सदस्यांनी केला. परंतु बेस्ट प्रशासन व समिती सदस्य यांच्यापुढे या मशीनबाबत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अजून पुढील सहा महिने बेस्टला नुकसान सहन करावे लागणार आहे..

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे बेस्टला दिवसाला लाखो रुपयांचा तोटा होत आहे. साल २०१६ मध्ये नवीन कंत्राट काढण्यात आले व ट्रायमॅक्सलाच नवीन कंत्राट मिळाले व त्यांनी ४००० नवीन मशीन बेस्टला पुरवल्या. मात्र, या मशीन अत्याधुनिक नसल्याचे सांगत महाव्यवस्थापकांनी परत पाठवल्या. तसेच ट्रायमॅक्स कंपनीच्या बरोबर असलेले नवीन कंत्राट महाव्यवस्थापकांना रद्द करावयाचे असून, असे कोणतेही कंत्राट मध्येच रद्द करता येत नाही. हे माहीत असतानाही बेस्टला जाणूनबुजून खड्ड्यात घालण्याचे काम ते करत असल्याचा आरोप बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी यापूर्वीच बेस्ट समितीच्या बैठकीत केला होता. तर ट्रायमॅक्सच्या ६५ टक्के मशीन बंद असून, बाकी मशीनही लवकरच नादुरुस्त होतील. एक दिवस सर्व मशीन बंद पडल्यावर बेस्टमध्ये खूप मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. बेस्ट महाव्यवस्थापकांनी ट्रायमॅक्सच्या बाबतीत स्थापन केलेल्या उपसमितीचा अहवालही मान्य केलेला नाही, असा आरोप सदस्य सुनील गणाचार्य यांनी यापूर्वी समिती बैठकीत केला होता. परंतु अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही.
Tags