मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या स्टीकरवरून गुन्हयाचा शोध

मुंबई - खारच्या कार्टर रोड येथील झुडपात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहामागचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या टेलरच्या स्टीकरवरून पोलिसांनी गुन्हयाचा शोध लावला आहे. मृत व्यक्तीचे नाव नारायण गुप्ता असे असून, मारेकरी रोहित अंबुरे याला सोलापूर येथून अटक करण्यात आली. पैशाच्या वादातून त्याच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. 

खारच्या कार्टर रोडवरील तिवरांच्या झुडपात २ जुलैला सकाळी एका अनोळखी मृतदेह सापडला होता. ओळख पटविण्यासारखे मृतदेहाजवळ काहीच नव्हते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, सहाय्यक निरीक्षक लोणकर, उपनिरीक्षक काटकर, पवार, वांद्रे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. मृतदेहावरील शर्टवर कल्याणमधील मोहने गावातील एका टेलरचा स्टीकर होता. या धाग्यावरून पोलिस मोहने गावात पोहोचले असता मृताचे नाव नारायण गुप्ता असल्याचे समजले. रोहित अंबुरे हा मित्र नारायणसोबत नेहमी असायचा, अशी माहिती चौकशीनंतर पुढे आली. पोलिसांनी रोहितबाबत माहिती काढली असता तो मूळचा नाशिकच्या सिन्नरचा असल्याचे समजले. पोलिसांनी सिन्नर गाठले पण त्या ठिकाणी तो सापडला नाही. पुणे-सोलापूर मार्गावरील वेळापूर येथील एका हॉटेलमध्ये तो असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. रोहित आणि नारायण 'वैष्णवी कॅटरर्स'मध्ये काम करायचे. रोहित सुपरवायजर होता. दोघांचे पैशावरून भांडण झाले आणि याच रागातून रोहितने नारायणची हत्या केली.
Tags