रत्नागिरी जिल्हा पर्यटनविषयक काॅफीटेबल बुक, संकेतस्थळाचे प्रकाशन

नागपूर 6 / 7/ 2018 - रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समिती निर्मित 'रत्नागिरी - एक स्वच्छंद मुशाफिरी' या मराठीतील तर Ratnagiri - Shores of wanderlust या इंग्रजी भाषेतील काॅफीटेबल बुकचे आज येथील रामगिरी निवास्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याशिवाय रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची माहिती जगभरातील पर्यटकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने www.ratnagiritourism.in या संकेतस्थळाचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सदानंद चव्हाण, आमदार रमेश लटके, जिल्हाधिकारी पी. प्रदीप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. काॅफीटेबल बुकमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पर्यटन वैभव दर्शविताना जिल्ह्यातील विविध किल्ले, सागर किनारे, ऐतिहासिक वास्तू,पुरातन गुंफा, मंदिरे, धबधबे आदींची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव, जैवविविधता, कला, महोत्सव,यात्रा जत्रा, कोकण रेल्वे आदी विविध माहिती, छायाचित्रांसह देण्यात आली आहे. संकेतस्थळावरही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची इत्यंभूत माहिती इंग्रजी आणि मराठी भाषेत समाविष्ट करण्यात आली आहे.