Type Here to Get Search Results !

पालिका डिजिटल बिनतारी संच विकत घेणार


मुंबई - मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाचे सध्याचे बिनतारी संदेश वहन संच कालबाह्य झाल्यामुळे त्याऐवजी नवीन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चालणारे बिनतारी संच विकत घेणार आहे. जलअभियंता खात्यामध्ये प्रचालनाच्या (ऑपरेशन्स) कामाचे संदेश वहन करण्यासाठी बिनतारी संचाचा वापर केला जातो. त्यासाठी शहर व नगरबाह्य विभागात एकूण ९४ संच कार्यरत आहेत. त्या व्यतिरिक्त २८ ठिकाणी बिनतारी संच बसवणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी महापालिका १ कोटी ४० लाख ७० हजार ८२६ रुपये खर्च करणार आहे.

त्यासाठी आवश्यक असलेला परवाना घेण्यात आला आहे. सध्या कार्यरत असलेले बिनतारी संच हे एनॉलॉग तंत्रज्ञानावर आधारित असून, ते सन २००७ मध्ये नगरबाह्य विभागासाठी तसेच २००९ मध्ये शहर विभागासाठी व सन २०११ मध्ये सुरक्षा विभागासाठी विकत घेण्यात आले आहे. ते सर्व संच कालबाह्य झालेले असून, त्याऐवजी नवीन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चालणारे बिनतारी संच विकत घेणे गरजेचे झाले आहे. शिवाय विक्रोळी चौकी, विलेपार्ले नियंत्रण कक्ष, निटी गेट, मुंबई महापालिका मुख्यालय, जांबोली ए.आर.व्ही.सी, पाच्छापूर चौकी आणि भिवंडीजवळील पांजरापूर संकुल येथे संदेश वहनातील त्रुटी कमी करण्यासाठी मनोरा उभारून त्यावर ॲटिना बसवून त्यांची उंची वाढवणे गरजेचे आहे, असे जलअभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जुने ९४ संच आणि नवीन २८ संच मिळून एकूण १२२ बिनतारी संच विकत घेऊन त्याची उभारणी करणार आहे. याबाबतच्या पालिकेच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. 
Tags

Top Post Ad

Below Post Ad