Type Here to Get Search Results !

आता बेस्टच्या दैनंदिन पाससाठी आयकार्डची गरज नाही

मुंबई - आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून अनेक योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाने आता प्रवाशांना दैनंदिन पास काढण्यासाठी आरएफआयडी कार्ड आवश्यक नाही, असा प्रस्ताव बेस्ट समितीच्या सभेमध्ये सादर केला होता. त्याला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून, या आधीच ही योजना राबवणे आवश्यक होते, असे मतदेखील व्यक्त केले. बेस्टचा दैनंदिन पास कोणत्याही प्रवाशाला काढता येणे सहज शक्य होणार आहे.

बेस्टचा दैनंदिन पास काढण्यासाठी प्रवाशांकडे आरएफआयडी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले होते. या कार्डसाठी प्रवाशांना काही रुपये मोजावे लागत होते; परंतु अनेक प्रवाशांकडे आरएफआयडी कार्ड नसल्यामुळे ते पास काढूशकत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक प्रकारची नाराजी पसरली होती. बेस्टने १० ऑगस्ट १५ पासून रविवार आणि सार्वजनिक सुट्टी दिवशी आरएफआयडी कार्डची अट शिथिल केली होती; परंतु आठवड्याच्या इतर दिवशी मात्र अट होती. परिणामी, बेस्ट प्रशासनाने सर्वच प्रवाशांना बसपास काढता यावा, या उद्देशाने आरएफआयडी कार्डचे बंधन शिथिल करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये सादर करण्यात आला. त्याला बेस्ट समिती सदस्यांनी मंजुरी दिली.
Tags

Top Post Ad

Below Post Ad