म्हाडावर पालिका मेहरबान का ? - भाजप

JPN NEWS

मुंबई - नगरसेवक जेव्हा पालिका प्रशासनाकडे इतर प्राधिकरणाच्या हद्दीतील कामे करायला सांगतात तेव्हा प्रशासन त्याला नकार देते, परंतु नेहरूनगर येथील म्हाडाच्या अलीदादा नाल्याच्या रुंदीकरणासाठी पालिका मेहेरबान का असा सवाल भाजपने उपस्थित केला. अलीदादा नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. परंतु भाजपसह इतर पक्षाच्या सदस्यांनी त्याचा तीव्र विरोध केला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव फेटाळला.

कुर्ला परिसरातील अलीदादा नाला व सहारा नाला हे म्हाडाच्या हद्दीत असताना देखील त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीमध्ये सादर केला. त्यावर भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेत या कामाचे पैसे रेल्वे देणार का, आपण हे काम कसे करणार असे सवाल विचारत हा प्रस्ताव फेटाळण्यात यावा अशी मागणी केली. तर बेस्टच्या हद्दीतील कामाबाबत बेस्ट कामासाठीसक्षम आहे असे सांगत प्रशासनाने कामास नकार दिला होता. परंतु आता पालिका म्हाडावर मेहरबानी का करत आहे, फोली कॉर्पोरेटेड शिपच्या प्रस्तावाबाबत अशी पॉलिसी नसल्याचे उत्तर देण्यात आले होते. मग आता हे काम कोणत्या विकासकाच्या फायद्यासाठी केले जात आहे, त्याचा खुलासा करावा अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. तर शिवसेनेचे मिलिंद वैद्य म्हणाले की , पालिकेने म्हाडाच्या जागेसाठी पुढाकार का घेतला आहे, इतर ठिकाणी हा न्याय का नाही. इतर प्राधिकरणाच्या हद्दीत काम करताना नगरसेवक निधी वापरता येणार नाही असे सांगितले जाते, पण पालिका म्हाडाच्या हद्दीत कसे काम करू शकते असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
Tags