लोकलच्या सर्वच डब्यांत सीसीटीव्ही


मुंबई - मध्य रेल्वेने महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी लोकलच्या महिलांच्या पाच कम्पार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. अशा २२ लोकलमध्ये आतापर्यंत ३५२ सीसीटीव्ही बसवून पूर्ण झाले आहेत. आता लोकलच्या सर्वच डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सीसीटीव्ही बसवण्याचे काम रेलटेल कंपनीला देण्यात आले आहे.

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या डब्यात प्रवाशांची छेडछाड, विनयभंग तसेच चोरीच्या घटनांची संख्या वाढत आहे. त्याचे गांभीर्य पाहून महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने २२ लोकलच्या महिलांच्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या महिलांच्या डब्यात प्रत्येकी दोन किंवा तीन सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे नियोजन केले असतानाच रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या प्रत्येक म्हणजेच १२ डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय अलीकडे घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव बनवून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, रेल्वेची उपकंपनी असलेल्या रेलटेल कंपनीकडे आता सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी दिली आहे. ही कंपनी हमसफर एक्स्प्रेसच्या धर्तीवर हे कॅमेरे बसवणार आहे. मध्य रेल्वेवर नव्याने दाखल झालेल्या १२ बम्बार्डियर लोकलच्या महिला डब्यात निर्मितीवेळीच कारखान्यात सीसीटीव्ही इनबिल्ट आहेत. माटुंगा वर्कशॉपमध्ये १० लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले. महिलांच्या सर्व पाच कम्पार्टमेंटमध्ये १६ सीसीटीव्ही, तर संपूर्ण लोकलमध्ये बसवायचे झाल्यास ८८ सीसीटीव्हींची गरज असल्याचे कुर्ला कारशेडचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता वेदप्रकाश यांनी सांगितले.
Tags